आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ परीक्षेचा बोजवारा:शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या बहिष्कार आंदोलनाचा परिणाम, संगमेश्वरमध्ये 1.45 मिनिटे उशिराने परीक्षा सुरू

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विद्यापीठाचे कंत्राटी कर्मचारी आणि विनाअनुदानित महाविद्यालयातील कर्मचारी आणि प्राध्यापक यांच्या मदतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा जरी सुरू झाल्या असल्या तरी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी यांच्या परीक्षेवरील बहिष्कार आंदोलनामुळे या परीक्षेचा बोजवारा उडाला आहे.

शहर व जिल्ह्यातील विद्यापीठासह 37 अनुदानित महाविद्यालयातील 750 शिक्षक कर्मचारी परीक्षेवरील बहिष्कार आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनामुळे 2 फेब्रुवारीपासून स्थगित केलेल्या परीक्षा सोमवारपासून ( दि. 6) बऱ्याच अडचणीनंतर उशिराने सुरू झाल्या. संगमेश्वर महाविद्यालयामध्ये दुपारी 12 चा पेपर 1.45 वाजता म्हणजे 1.45 मिनिटे उशिराने सुरू झाला. दयानंद व छत्रपती शिवाजी महाविद्यालयमध्ये 30 मिनिटापर्यंत परीक्षा उशिराने सुरू झाल्या. ग्रामीण भागामध्येही 15 मिनिटापर्यंत उशीर झाला.

अंतर्गत परीक्षेसारख्या परीक्षा

विद्यापीठाच्या या परीक्षा महाविद्यालयातील अंतर्गत परीक्षेससारख्याच झाल्या. कोणतीही गुप्तता नव्हती. बेंचवर नंबर टाकले नव्हते, त्याच महाविद्यालयातील विद्यार्थी असल्यामुळे वर्गात रोलनंबर प्रमाणे बसविले होते. काही ठिकाणी बहिस्थ परीक्षकही नव्हते. बऱ्याच ठिकाणी आय.टी.समन्वयक शिक्षकेतर कर्मचारी असल्यामुळे ऐन वेळेस आय.टी.समन्वयक बदलले. त्यामुळे युजर आयडी पासवर्ड त्यांना द्यावे लागले. त्यामुळे पेपर डाऊनलोड करण्यास उशीर झाला.

विद्यापीठाने महाविद्यालयात ऐन वेळेस नियुक्त केलेले कंत्राटी कर्मचाऱ्यांकडे विद्यापीठाचे लेखी आदेश नव्हते किंवा त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते. त्यामुळे विद्यापीठाने लेखी आदेश द्यावेत, अशी मागणी काही प्राचार्यांनी केली. त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना परीक्षा विभागातील कामाचा अनुभव नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडून काम कसे करून घेणार आणि हे गुप्त काम त्यांच्याकडे कसे सोपवावे, असा प्रश्न संबंधित प्राचार्यपूढे आला होता. परीक्षा झाल्यानंतर प्राध्यापकांनी उत्तरपत्रिकेचे गठ्ठे सीलबंद केले.

लेखी आश्वासनाशिवाय माघार नाही

आतापर्यंत विद्यार्थी हित लक्षात घेऊन दोन वेळा आम्ही माघार घेतली आहे. परीक्षावरील बहिष्कार आंदोलन सुरूच असून संपातील कोणतेही कर्मचारी परीक्षेचे काम करणार नाहीत. लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत परीक्षा बहिष्कार आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असे सोलापूर विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात व सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले व सरचिटणीस राजेंद्र गिड्डे, अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अभिजित जाधव व सचिव भीमा मस्के यांनी केले आहे.

विद्यापीठाचा कर्मचारी पाठवा : अक्कलकोट

बऱ्याच अडचणीनंतर सोमवारी आम्ही परीक्षा सुरळीत पार पडल्या आहेत. मात्र, मंगळवारपासून या परीक्षेसाठी विद्यापीठाचा कर्मचारी पाठवा. त्याशिवाय आम्ही परीक्षा घेऊ शकत नाही, अशी मागणी अक्कलकोटच्या खेडगी महाविद्यालयाने विद्यापीठाकडे केली आहे.

बातम्या आणखी आहेत...