आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासंथगती कामाचा फटका साेलापूर विद्यापीठात शिकणाऱ्या ७० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनींना बसत आहे. नोव्हेंबरमध्ये झालेल्या दीक्षांत प्रमाणपत्र वाटप करण्यास तब्बल पाच महिने लावले. फेब्रुवारीमध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल अजून जाहीर झालेला नाही. ८० दिवसांहून अधिक कालावधी लोटला आहे. तब्बल ४० टक्के अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर होणे अद्याप बाकी आहेत.
विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाकडून एकूण २४० अभ्यासक्रमांसाठी परीक्षा घेतल्या जातात. पुण्श्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा २० फेब्रुवारीपासून सुरू झाल्या. आतापर्यंत ६० टक्के अभ्यासक्रमांचे निकाल लागले आहेत. उर्वरित निकाल राम भरोसे. यातून डिजिटल विद्यापीठाची बिरूद मिरविणाऱ्या सोलापूर विद्यापीठाची संथगती अधोरेखित झाली आहे. विद्यापीठाशी १०४ महाविद्यालये संलग्नित आहेत. यातील विद्यार्थ्यांची संख्या पाहता प्राध्यापकांना उत्तरपत्रिका तपासणीला खूप वेळ लागला आहे.
कुलपती कार्यालयाला द्यावा लागेल उशिराचा हिशेब
अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर नाहीत. त्यामुळे वॉर रूम तयार केली आहे. सतत आढावा घेतला जात आहे. तांत्रिक अडचणींवर उपाय सुचवले आहेत. त्यानुसार परीक्षा विभागाची टीम कामाला लागली आहे. अधिष्ठातांची नियुक्तीही झाल्याने त्यांनाही सोबत घेऊन काम करण्याची सूचना दिलीआहे. -डॉ. रजनीश कामत, प्रभारी कुलगुरू, विद्यापीठ, सोलापूर
सुमारे ३५ हजार विद्यार्थी निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. काही अभ्यासक्रमांच्या मोजक्या उत्तरपत्रिका तपासणी बाकी आहेत. कधी कधी पाच -सहा उत्तरपत्रिका तपासणीसाठीही कॅप सेंटरवर येण्याचा आग्रह प्राध्यापकांना धरला जात आहे. संेंटरवर येऊनच डिजिटल पद्धतीने उत्तरपत्रिका तपासणी करण्याची पद्धत आहे. उत्तरपत्रिका तपासणीचा वेग त्यामुळेच मंदावला आहे. सेंटरवर येऊनच उत्तरपत्रिका तपासायचे असेल, तर मग ऑनस्क्रीनचा पद्धतीचा उपयोगच काय?
तब्बल ४ लाख २० हजार उत्तरपत्रिका तपासणीचे लक्ष्य उत्तरपत्रिका तपासणीतील मानवी हस्तक्षेप कमी व्हावा, निकाल वेगाने जाहीर व्हावा यासाठी प्रथमच सर्व अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिका संगणकावर तपासण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. तांत्रिकदृष्ट्या कोणतीही पूर्व तयारी केली नाही. केवळ एक दिवसांची कार्यशाळा उरकून आॅनस्क्रीन उत्तरपत्रिका तपासण्याची जबाबदारी प्राध्यापकांवर टाकण्यात आली.
सुमारे ७० हजार विद्यार्थ्यांच्या तब्बल ४ लाख २० हजार उत्तरपत्रिका स्कॅन करणे, ते संगणकावर अपलोड करण्याच्या दिव्य कामाचा अंदाज परीक्षा मंडळास आला नाही. ते लवकर होईल आणि प्राध्यापक ते ऑनस्क्रीन तपासतील आणि हे काम अवघ्या काही दिवसांत पूर्ण होईल, असे स्वप्न विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाने पाहिले असावे. प्रत्यक्षात परीक्षा संपून ८० दिवस उलटून गेले तरी ४० टक्के अभ्यासक्रमांचे निकाल लावणे अद्याप बाकी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.