आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरशी ऋणानुबंध:करमरकरांमुळे क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा; असे निरलस, प्रामाणिक व्यक्तिमत्त्व दुर्मिळ!

संजीव पिंपरकर | सोलापूर18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचा आणि सोलापूरचा विशेष ऋणानुबंध. महापौर चषकासारख्या स्पर्धा महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचल्या त्या करमरकरांच्या लेखणीमुळेच. सतत हसरा चेहरा असलेली ही वामनमूर्ती पार्क मैदानावर सर्वत्र वावरताना स्पर्धेच्या आयोजकांवरही आदरयुक्त दबाव असायचा. स्वर्गीय करमरकर यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

वि. वि. करमरकर उर्फ विविके (वय ८६) यांच्या निधनाने मराठी वृत्तपत्र सृष्टीमध्ये क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळवून देणारे व्यक्तिमत्त्व हरपले. करमरकर हे काय व्यक्तिमत्त्व होते, हे क्रीडा क्षेत्रातील ज्येष्ठ लोकांना चांगले माहीत आहे. संघटक, खे॓ळाडू व क्रीडाप्रेमी हे करमरकर उद्या काय लिहिणार याच्या प्रतीक्षेत असत. क्रीडा पत्रकारितेला इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये भरपूर स्थान मिळायचे. पानेच्या पाने क्रीडाविषयक मजकुरांनी भरलेली असायची. त्या तुलनेत मराठी वृत्तपत्रे क्रीडा मजकुराला मर्यादित स्थान, महत्त्व द्यायचे. अशा काळात दोन्ही बाबतीत मराठी क्रीडा पत्रकारितेला प्रतिष्ठा मिळाली ती करमरकरांच्या लिखाणाने.

सोलापूरचा व त्यांचा विशेष ऋणानुबंध होता. सोलापूर महापालिका महापौर चषक क्रीडा स्पर्धा भरवत असे. या स्पर्धा महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचल्या, त्या नावाजल्या जाऊ लागल्या, त्यास बऱ्याच अंशी करमरकर कारण आहेत. त्या काळातील सोलापुरातल्या क्रीडा संघटकांना याची चांगली जाणीव आहे. सुरुवातीच्या काळात या स्पर्धांच्या वार्तांकनासाठी ते यायचे.

क्रिकेट असो किंवा कबड्डी, खो खो सारख्या देशी खेळांच्या वार्तांकनामध्ये त्यांचा हातखंडा होता. खेळाची, त्याच्या तांत्रिक बाबींची, संघटनांमधील राजकारण, खेळाडूंच्या कामगिरीची त्यांना अद्ययावत माहिती असायची. खेळाडूंवर होणारा अन्याय, त्यामागचे हेवेदावे, संघटनात्मक गैरप्रकार, भ्रष्टाचार यावर ते तुटून पडत. संघटकांकडून दाबायचा प्रयत्न होणाऱ्या खेळाडूंना तो एक आघार असायचा. त्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे क्रीडा पत्रकारितेमध्ये येऊ पाहणाऱ्या नवशिक्यांना ते मार्गदर्शन करीत असत. सोलापुरात महाराष्ट्र विरुद्ध मुंबई रणजी करंडक सामन्याचे वार्तांकन मी प्रेस बॉक्समध्ये त्यांच्या शेजारी बसून केले आहे. माझ्यासारखा नवख्या, हौशी उमेदवार पत्रकाराला त्यांनी शिकवलेले धडे कायम स्मरणात आहेत. मी दुसऱ्या वृत्तपत्रासाठी काम करतोय, याचा विचार त्यांनी केला नाही. क्रीडा पत्रकाराबरोबरच एक चांगली, निरलस व प्रामाणिक व्यक्ती म्हणून त्यांची ख्याती होती. सतत हसरा चेहरा असलेली ही वामनमूर्ती पार्क मैदानावर सर्वत्र वावरताना स्पर्धेच्या आयोजकांवरही आदरयुक्त दबाव असायचा. क्रीडा पत्रकारितेमध्ये असे व्यक्तिमत्त्व मिळणे आजच्या व्यावसायिक जमान्यात जरा कठीणच.

बातम्या आणखी आहेत...