आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:एसटीला करणार अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग, प्रवास होणार सुरक्षित; कोरोनाकाळातील फटका पाहता दीर्घकालीन उपाययोजनेची सुचली कल्पना

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोना काळात महामंडळाला मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे.

राज्यातील प्रत्येक एसटीचा प्रवास आता अधिक सुरक्षित होईल. कारण महामंडळाने एसटीला अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचे ठरवले आहे. याच्या निविदा निघाल्या असून पुढील महिन्यापासून कामाला सुरुवात होईल. या कोटिंगमुळे विषाणूंपासून सुरक्षा कवच मिळेल. पर्यायाने प्रवासी सुरक्षित प्रवास करू शकतील. कोरोनाचा सर्वाधिक फटका एसटी महामंडळाला बसला. या काळात आसनक्षमता मर्यादा आणि लॉकडाऊनमुळे एसटीचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर बुडाले.

या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने राज्यातील सर्व एसटी बसना अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्याचा निर्णय घेतला. येत्या महिन्यापासून राज्यातील प्रत्येक एसटीला टप्प्याटप्प्याने कोटिंग करून प्रवाशांना सुखद आणि सुरक्षित प्रवास करता यावा याकरिता महामंडळ प्रयत्नशील असणार आहे. यात शिवशाही, मिनी लक्झरी, अश्वमेध, शिवनेरी आणि साध्या एसटी अशा एकूण १७२२८ एसटींना हे कोटिंग दिले जाणार आहे.

उत्तम संकल्पना
हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे प्रवासी सुरक्षित राहतील. कोरोना किंवा तत्सम संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने याचा उपयोग होईल. -डॉ. नितीन तोष्णीवाल, श्वसन व फुप्फुसतज्ज्ञ

काम सुरू झाले आहे
निविदांचे काम सुरू झाले आहे. येत्या महिन्यापासून प्रत्येक विभागात १७२२८ एसटीकरिता टप्प्याटप्प्याने हे काम लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. हे एक वेगळे पाऊल असणार आहे. -शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई

अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग असे करते काम
आरोग्याच्या दृष्टीने हे तंत्र विषाणूंचा प्रसार रोखते. विशेष म्हणजे एखाद्या वस्तूवर हा थर दिला असेल आणि ती वस्तू नियमितपणे किंवा सातत्याने पाण्याच्या संपर्कात असेल किंवा धुतली जात असली तरी या कोटिंगची विषाणूरोधक क्षमता कमी होत नाही. आगामी काळात या कोटिंग तंत्राचा वर्दळ असलेल्या विविध सरकारी किंवा खासगी इमारतींमध्येही वापर वाढू शकतो.

कुठे असणार कोटिंग
एसटी बसमध्ये आसन, हँड रेस्ट, गार्ड रेल, रेलिंग, पॅसेंजर डोअर या ठिकाणी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग होणार आहे. अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग वैज्ञानिकरीत्या कोरोना व्हायरस, विषाणू, बुरशी व इतर जिवाणूंपासून पुरेसे आणि दीर्घकाळ संरक्षण प्रदान करेल हे सिद्ध झालेले आहे.

बातम्या आणखी आहेत...