आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:एसटी कर्मचारी आझाद मैदानात उपोषणाला बसले, विलीनीकरण जाहीर करा, मगच कामावर येऊ, कर्मचारी अन्नत्यागाला सिद्ध

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एसटी कर्मचारी शासनाच्या अल्टिमेटमपुढे बधताना दिसत नाहीत. सोलापूरचे अनेक कर्मचारी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसले आहेत. विलीनीकरण जाहीर करा, मगच कामावर येऊ, अशी भूमिका घेतली आहे. मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या तब्बल दीड हजाराहून अधिक आहे. तेथे अन्नत्याग उपोषण करण्यात येत आहे. येत्या चार दिवसांत पंचवीस हजार कर्मचारी या उपोषणाशी जोडले जातील, अशी माहिती कर्मचारी नेते मनोज मुदलियार यांनी दिली आहे.

सोलापुरात जिल्हाभरातून १६ कर्मचारी तर सोलापूर आगारात गेल्या दोन दिवसांत फक्त पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यातील एक कर्मचारी कार्यशाळेतील, एक कर्मचारी वाहक, एक कर्मचारी चालक आणि इतर कार्यालयीन कामकाज यातील कर्मचारी असून येत्या काही दिवसांत आणखी कर्मचारी कामावर परततील, असा विश्वास प्रशासनाला वाटत होता. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रशासनालाच एप्रिल फूल करत आझाद मैदान गाठले आहे.

उपमुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार तंबी भरत कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचे अल्टिमेटम देण्याचे काम शासन करत आहे. न्यायालयाने ५ एप्रिल हा दिवस निर्णयासाठी राखून ठेवला आहे. पाच एप्रिलनंतरच आम्ही विचार करू, असा इशारा कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला दिला आहे.

दोन दिवसांत केवळ पाच कर्मचारी
या दोन दिवसांत केवळ पाच कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. येत्या काळात बरेच कर्मचारी कामावर हजर होतील, असे वाटत आहे. ५ तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल. दत्तात्रय कुलकर्णी, आगार प्रमुख, सोलापूर

कोणतेही प्रलोभन द्या, हटणार नाही
दुःखवट्यात असणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्याला प्रलोभन द्या किंवा धमकी द्या, ते या दुखवट्यातून हलणार नाहीत, घाबरणार नाहीत. प्रशासन कुटील आणि कपटी राजकारण करत आहे. सोबत शासनही आहे. मनोज मुदलियार, संपकरी कर्मचारी नेता.

बातम्या आणखी आहेत...