आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कानउघडणी:नेहरू वसतिगृह 15 दिवसांत सुरू करा; जेवणासाठी किचनशेड उभारा, निधी देऊ

सोलापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरामध्ये शिकणाऱ्या गावाकडील विद्यार्थ्यांना सोयीचे ठिकाण असणाऱ्या नेहरू वसतिगृहाची देखभाल दुरुस्ती, स्वच्छता करून १५ दिवसांमध्ये सुरू करा. तेथे राहणाऱ्या अनेकांची जेवणाची गैरसोय होते. त्यासाठी स्वतंत्र किचनशेडची उभारणी करून बचत गटाच्या माध्यमातून सवलतीमध्ये दोन वेळच्या चांगल्या जेवणाची सोय करा. त्यासाठी आमदार निधीतून मदत करण्यात येईल, अशा सूचना शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी जिल्हा परिषद प्रशासनास दिल्या.

नेहरू वसतिगृह कुलुपबंद असल्याबाबत गुरुवारी (दि.२३) दिव्य मराठीमध्ये ‘शहरामध्ये शिकणाऱ्या गावाकडील विद्यार्थ्यांची अडचण, जि. प. उदासीन’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध झाली. त्याची दखल घेऊन काँग्रेसच्या आमदार शिंदे यांनी गुरुवारी (दि. २३) नेहरू वसतिगृहास भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षणाधिकारी संजय जावेर, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, शाखा अभियंता रमेश चौगुले, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे, महिबूब काझी आदी उपस्थित होते. वसतिगृहाच्या आवारात सर्वत्र गवत, झुडुपं उगवली असून खोल्यांमध्ये विद्यार्थ्यांना बेड नसल्याने जमिनीवर झोपावे लागत असल्याचे, समजल्यावर त्यांनी संताप व्यक्त केला. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या सोयी-सुविधा देण्यासाठी काय अडचण आहे? शिक्षणासाठी येणाऱ्याच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊ नका? त्यांना चांगल्या सुविधा देणे, अभ्यासासाठी प्रोत्साहित करण्याच्या कर्तव्याचा विसर पडू देऊ नका, अशा शब्दांत त्यांनी कानउघाडणी केली. सर्व खोल्यांमध्ये चांगल्या दर्जाचे बेड, गादी, साहित्य ठेवण्यासाठी कपाटं द्यावीत. वसतिगृहातील वायरिंग दुरुस्ती करा, लॅपटॉप चार्जिंगसाठी सोय करून द्या, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या.

वसतिगृहात स्वतंत्र किचन शेड सुरू करा, बचत गटाला चालवायला द्या, किचनशेडसाठी मी आमदार निधी देते, असेही आमदार शिंदेंनी सांगितले. तसेच, हिवाळ्यात स्नानासाठी गरम पाण्याची सोय करा, सौरसंच बसवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून निधीसाठी प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी दिल्या. शेळगी येथील मुलींना वसतिगृहामध्ये सर्व सोयी-सुविधांसह, सुरक्षा यंत्रणा सक्षम करा, असेही त्यांनी सांगितले.

वरिष्ठांशी चर्चा करून प्रवेश प्रक्रिया सुरू करू
आमदार प्रणिती शिंदे यांनी नेहरू वसतिगृहास भेट देऊन काही सूचना केल्या. किचन शेड सुरू करण्यासाठी आमदार निधी देण्याची तयारी दर्शविली, त्याचा निश्चित विद्यार्थ्यांना फायदा होईल. दुरुस्तीची कामं लवकर करून नेहरू वसतिगृह, शेळगीतील विद्यार्थ्यांचे वसतिगृह सुरू होईल. वरिष्ठांशी चर्चा करून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात येईल.
संजय जावेर, उपशिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद

बातम्या आणखी आहेत...