आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सोलापूर:कौटुंबिक कारणातुन दोन चिमुकल्यांसह विवाहितेची आत्महत्या, पहाटेच्या सुमारास उघडकीस आली घटना

मोहोळएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

कौटुंबिक कारणातुन तालुक्यातील भोयरे येथील 30 वर्षीय विवाहितेने आपल्या दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मंगळवारी पहाटे ही हृदयविदारक घटना उघडकीस आली. स्वाती कैलास साठे, मुलगा अभिजित, मुलगी परी अशी मृतांची नावे आहेत. मुलगा अभिजित याचा मृतदेह सायंकाळी 4 वाजता पोलिसांच्या हाती लागला.

याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, भोयरे येथे कैलास भाऊराव साठे हे पत्नी स्वाती, मुलगा अभिजित (वय वर्ष 6) व मुलगी परी (वय वर्ष 2) यांच्यासह राहतात. कुटुंबाची उपजीविका करण्यासाठी कैलास हे शेती करतात. दरम्यान मंगळवारी (12 मे) पहाटे 5 वाजेच्या सुमारास प्रदीप साठे यांना विकास भाऊराव साठे यांच्या मालकीच्या विहिरीत कोणीतरी पडल्याचे दिसले. त्याबाबत तात्काळ प्रदीप साठे यांनी पोलिस पाटील नागेश पाटील यांना संपर्क करून ही माहिती दिली. त्यावेळी दोघांनीही विहिरीजवळ जाऊन पाहिले असता लहान मुलगी विहिरीच्या पाण्यावर तरंगताना दिसली. याबाबत दोघांनीही जवळपासच्या वस्त्यांवर चौकशी केली असता जवळच असलेल्या कैलास भाऊराव साठे यांची पत्नी स्वाती कैलास साठे, मुलगा अभिजीत व मुलगी परी हे घरी नसल्याचे समजले. तत्काळ सर्वांनी विहिरीकडे धाव घेतली असता विहिरीत पडलेली मुलगी ही परी असल्याचे निदर्शनात आले. पोलिस पाटील नागेश पाटील यांनी यासंदर्भात मोहोळ पोलिस ठाण्यात खबर दिली. त्यानुसार मोहोळ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत कोकणे, सहायक पोलिस निरीक्षक आशुतोष चव्हाण व पोलिस कॉन्स्टेबल गणेश पोपळे आदींनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा तरंगणारा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता स्वाती हिचा मृतदेह सापडला. दोन्ही मृतदेह मोहोळ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणले होते. 

विहीर ही 40 फूट खोल असल्याने अभिजीतला शोधण्याचे काम सायंकाळपर्यंत युद्धपातळीवर सुरू होते. विहिरीतील पाणी काढण्यासाठी 2 मोटारी सुरू करण्यात आल्या होत्या. अखेर चार वाजेच्या सुमारास अभिजीतचा मृतदेह बाहेर काढण्यात पोलिस व ग्रामस्थांना यश आले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे.

बातम्या आणखी आहेत...