आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जबाबदारी:कर्नाटक मुख्यमंत्री निवडीसाठी सुशीलकुमार शिंदे निरीक्षक, हायकंमाडने पाठवलेल्या विमानातून शिंदे थेट बंगळुरूला

प्रतिनिधी | सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कर्नाटकात तब्बल १३६ जागा जिंकून काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार यांच्यासह विजयपूर येथील डॉ. एम. बी. पाटील यांचेही नाव मुख्यमंत्री पदासाठी आघाडीवर आहे. दरम्यान, मुख्यमंत्रिपदाचा तिढा सोडवण्यासाठी काँग्रेसने पक्ष निरीक्षकपदी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचीही निवड केली. दिल्लीवरून काँग्रेस हायकमांडने शिंदे यांच्यासाठी सोलापूरला स्पेशल चार्टर विमान पाठवून बंगळुरूला बोलावून घेतले.

शनिवारी (दि. १३) कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. रविवारी (दि. १४) माजी केंद्रीय मंत्री शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांचे जनवात्सल्य निवासस्थानी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात स्वागत केले. कर्नाटकातील विजयामध्ये शिंदेंचा सक्रिय सहभाग असल्याने त्यांच्या सत्कारासाठी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सत्कार, जल्लोष सुरू असतानाच दुपारी काँग्रेसच्या दिल्लीतील वरिष्ठ नेतेमंडळींनी शिंदे यांना मोबाइलवर संपर्क साधत तातडीने बंगळुरूला येण्यास कळविले. त्यांच्यासाठी स्वतंत्र विमान सोलापूरला पाठवण्यात आले होते. साडेचारच्या सुमारास शिंदे बंगळुरूला रवाना झाले. त्यांच्यासोबत काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटेही गेले.

पक्ष निरीक्षक म्हणून सुशीलकुमार शिंदे यांच्यासह जितेंद्र सिंग, दीपक बाबरीया आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षातील घडामोडींवर लक्ष ठेवण्यासह सर्व आमदारांशी चर्चा करून त्या संदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींकडे पाठवण्यात येईल. नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव जाहीर होईपर्यंत शिंदे बंगळुरूमध्ये असतील.

२०२४ ला देशात निश्चित परिवर्तन : शिंदे

कार्यकर्त्यांनी सत्कार केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, की काँग्रेसचा चेहरा सर्वधर्मसमभावाचा आहे. आम्हाला १०५ जागांची अपेक्षा होती, मात्र १३५ जागा देऊन कर्नाटकच्या जनतेने भाजपची हुकूमशाही उलथवून टाकली. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत देशामध्ये निश्चित परिवर्तन होईल.

आमदारांशी चर्चा करून अहवाल देणार

काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्री निवडीच्या प्रक्रियेसाठी निरीक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. पक्षाच्या धोरणानुसार सर्व आमदारांशी चर्चा करून त्या संदर्भातील अहवाल हायकमांडकडे सादर होईल. मुख्यमंत्री पदासाठी काही नावे चर्चेत आहेत. तेथे गेल्यानंतर सर्वांशी चर्चा, विचारविनिमय करून त्या संदर्भातील निर्णय होईल. - सुशीलकुमार शिंदे, ज्येष्ठ नेते, काँग्रेस