आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंद्रूप येथील घटना:अनैतिक संबंधाचा संशय; वादातून एकाचा खून; पाच जणांना अटक

दक्षिण सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अनैतिक संबंधाच्या संशयाच्या वादातून ऊसतोड मुकादमासह पाच जणांनी मिळून चालकास जबर मारहाण करून खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पोत्यात बांधून विल्हेवाट लावण्यासाठी झोपडीत लपवून ठेवला. याची माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याप्रकरणी ऊसतोड मुकादमासह पाच जणांना मंद्रूप पोलिसांनी अटक केली आहे.

रमेश केशव मिसाळ (वय ३४, रा. खोकरमोहा, ता. शिरूरकासार, जि. बीड) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. या प्रकरणी अभिमान बाजीराव साबळे, मनीषा अभिमान साबळे, अशोक बगीनाथ गिरी, अंजना अशोक गिरी (सर्व रा. मलकाची वाडी ता. शिरूर कासार जि. बीड) व मलप्पा मळसिद्ध कांबळे (रा. सादेपूर ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर ) यांना अटक करण्यात आले आहे. मंद्रूप येथील निंबर्गी रस्त्यावरील सीतामाई तलावाजवळ चार झोपड्या टाकून ऊसतोड मजूर राहत होते. भंडरकवठेच्या लोकमंगल साखर कारखान्यासाठी त्यांची ऊसतोड टोळी होती. सोमवारी रात्री आरोपी व मयत सर्वजणांनी मिळून जेवण केले. रात्री अकरा वाजता मुकादम अभिमान साबळे व अशोक गिरी यांच्या झोपडीजवळ ते गप्पा मारत होते. तेव्हा दारूच्या नशेत चालक रमेश मिसाळ मुकादम अभिमान साबळे याची पत्नी मनीषा हीस अश्लील बोलू लागला. तू माझ्यासोबत झोपण्यास चल असे म्हटला.

हे ऐकून अशोक गिरी व मल्लाप्पा कांबळे यांनी अभिमान यास असला कसला तुझा मित्र. तुझ्या बायकोस झोपण्यास चल म्हणतो. असे म्हणून वाद घातला. तेव्हा नशेत असलेल्या रमेश याने अशोक गिरी यास अभिमानची बायको येत नाही तर तुझी बायको पाठव असे म्हटला. हे ऐकून गिरी याचा पारा चढला. त्यांनी रमेश याला मारहाण सुरू केली. त्यानंतर अभिमान साबळे यांनीही जवळच असलेले एक लाकूड घेऊन रमेश यास मारहाण केली. त्यानंतर वरील पाच जणांनी रमेश यास लाकडाने व लाथाबुक्क्याने बेदम मारहाण केली. यामुळे तो बेशुद्ध होऊन झोपडी समोरच निपचित पडला. सकाळी उठून पाहिले तर त्याचा जागीच मृत्यू झाला होता. त्यानंतर त्यास ओढत झोपडीत आणले. एका पोत्यात त्यांचा मृतदेह बांधून पलंगाच्या आड झाकून ठेवला.

दरम्यान या प्रकरणाची माहिती फिर्यादी बाळू पवार यांनी मंद्रूप पोलिसांना दिली. त्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र मांजरे हे पोलिस पथकासह तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांनी भेट देऊन पाहणी केली. मंद्रूप पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

बातम्या आणखी आहेत...