आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील चौघांचे स्वॅब घेतले, चिखली गाव सिल

उस्मानाबादएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • रुग्णाच्या वडीलांनी गावासह परिसरात विकली भाजी

सोलापूर जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त पोलिस कर्मचाऱ्याच्या चिखली (ता. उस्मानाबाद) येथील कुटुंबातील चौघांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. कर्मचाऱ्याच्या वडीलांनी गावासह परिसरात भाजी विक्री केल्याने संसर्गाच्या शक्यतेने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.‌ दरम्यान, संपूर्ण गाव खबरदारी म्हणून लॉक केले असून बाहेरच्या व्यक्तीला गावात येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

सोलापूर पोलिस दलातील बार्शी तालुक्यात कार्यरत असलेल्या एका पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे शुक्रवारी (दि. 1) समोर आले. याला तत्पूर्वी तीन ते चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणे दिसण्यास सुरुवात झाली होती. यामुळे त्याचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला होता. त्याच्या अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्यामुळे पोलिस कर्मचाऱ्याचे मुळ गाव असलेल्या चिखलीतही खळबळ उडाली. कारण कोरोनाची लक्षणे सुरू होण्याच्या अगोदरच 24 व 25 एप्रिललाच चिखली येथे मुळ गावी येऊन गेल्याची चर्चा सुरू झाली. यामुळे गावात अचानकच भीतीचे वातावरण तयार झाले. गावातील काही नागरिकांनी पोलिस व आरोग्य प्रशासनाला याची माहिती सांगितली. तेव्हा खबरदारी म्हणून त्या पोलिस कर्मचाऱ्यांचे वडील, आई, भाऊ व भावजय यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे. त्यांचे तपासणीसाठी स्वॅब घेण्यात आले आहेत.

दरम्यान चाैघांनाही कोरोनाच्या अनुषंगाने कोणतेही लक्षणे आढळलेली नाहीत. मात्र, त्यांचे अहवाल प्राप्त होईपर्यंत चाैघांना निरिक्षणात ठेवण्यात येणार आहे. अहवालात कोरोनाची लागण झाल्याचे आढळले तर त्यांना कोविड सेंटरमध्ये ठेवून उपचार करण्यात येतील. तसेच लागण नसेल तर वैराग रोड येथील मुलींच्या निवासी शाळेत इन्स्टीट्युशनल कोरोंटाईन करण्यात येणार असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.

यामुळे वाढली काळजी

पोलिस कर्मचाऱ्याला कोरोनाची लक्षणे आढळण्याच्या तीन ते चार दिवस अगोदरच तो कुटुंबीयांना जाऊन भेटला  होता. त्यानंतर त्यांच्या वडीलांनी चिखलीसह अन्य गावातही भाजीपाला विक्री केली. यामुळे त्यांच्या संपर्कात अनेक लोक आले आहेत. त्यांच्यापासून आणखी लोकांना कोरोनाची लागण होऊ शकते. मात्र, अहवालात त्यांनाच लागण झालेली नसल्याचे दिसून आल्यास धोका टळणार आहे. यामुळे सर्वजन त्यांना लागण होऊ नये म्हणून प्रार्थना करत आहेत.

गावाच्या सीमा सील

गावाच्या चारही बाजूच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. गावात कोणत्याही व्यक्तीला येण्यास पायबंद घातला आहे. गावात अलहाबाद व एसबीआय बँकेचे केंद्र आहेत. तेथेही परगावातील व्यक्तीला व्यवहार करण्यासाठी बंदी घातली आहे. मात्र, गावातून जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील वाहतुक सुरू ठेवण्यात आली असून वाहनातील व्यक्तीला गावात उतरू दिले जात नाही.

बातम्या आणखी आहेत...