आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील ३६८.७१ कोटी रुपयांच्या विकासकामांना शासनाच्या हायपॉवर कमिटीने मंजुरी दिली आहे. शिखर समिती आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर आराखड्यातील भक्तनिवास, वाहनतळ, रस्ते, चौक सुशोभीकरणासह विविध ४२ विकासकामांना जूनअखेरपर्यंत प्रत्यक्षात सुरुवात होईल, असा दावा लोकप्रतिनिधींकडून करण्यात येत आहे. सध्या अक्कलकोटमध्ये पुरेसे वाहनतळ व शासकीय भक्तनिवासाची पुरेशी सोय नाही. त्यामुळे काही भाविक कर्नाटकातील गाणगापूरला मुक्कामासाठी जातात. वाहनतळ व भक्तनिवासाची सोय झाल्यानंतर गैरसोय टळेल व स्थानिक बाजारपेठेलाही आर्थिक चालना मिळेल.
दररोज दहा हजार भाविक दर्शनाला
श्री स्वामी समर्थ यांच्या वास्तव्याने अक्कलकोटची भूमी पावन झाली आहे. दररोज सरासरी दहा हजार तर वर्षाला जवळपास तीन कोटी सहा लाख भाविक दर्शनासाठी येथे येतात, अशी माहिती श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश इंगळे यांनी दिली. पूर्वी दर गुरुवारी, पौर्णिमेला, श्री स्वामींच्या प्रगटदिनी व पुण्यतिथीसाठी भाविकांची गर्दी असायची. आता मात्र दररोजच गर्दी असते. सोलापूरपर्यंत रेल्वेमार्गाची कनेक्टिव्हिटी, सोलापूर-अक्कलकोट रस्तेमार्गाचे अंतर केवळ ४० किलोमीटर आहे. चौपदरी महामार्गाने हा प्रवास केवळ अर्ध्या तासात होतो. भाविकांची संख्या वाढीचे हेच प्रमुख कारण आहे. म्हणूनच भाविकांच्या मूलभूत सोयींसाठी वेळीच व वेगात अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे मार्गी लावण्याचे प्रशासन व लोकप्रतिनिधींसमोर आव्हान आहे.
अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील कामे
जूनअखेरपर्यंत कामे सुरू होणार
शासनाच्या हायपाॅवर कमिटीने अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी दिली आहे. आता केवळ शिखर समिती व मंत्रिमंडळाची मंजुरी बाकी आहे. कर्नाटकातील निवडणुका संपल्यानंतर त्यालाही लवकरच मंजुरी मिळेल. जूनअखेरपर्यंत टप्प्याटप्प्याने विकास आराखड्याच्या कामांना प्रत्यक्षात सुरुवात होईल. -सचिन कल्याणशेट्टी, आमदार, अक्कलकोट
दर्शनरांगेची कायमस्वरूपी सोय हाेणार
श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिराच्या दक्षिण महाद्वारापासून ते श्री मुरलीधर मंदिरापर्यंत पत्रा शेड उभे करून दर्शनरांगेची कायमस्वरूपी सोय करण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विकासकामांपैकी प्रामुख्याने वाहनतळ, शहरांतर्गत रस्ते आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याची गरज आहे. बाहेरगावच्या भाविकांसाठी हेच महत्त्वाचे आहे. -महेश इंगळे, अध्यक्ष, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान, अक्कलकोट
वाहनतळ, रस्ते, चौक सुशोभीकरणासह इतर सुविधाही होणार
आतापर्यंत चार वेळा पाठवला प्रस्ताव
आजवर अक्कलकोट तीर्थक्षत्र विकास आराखडा महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी चार वेळा पाठवला होता. पहिला प्रस्ताव १९९७ मध्ये पाठवला तेव्हा ९५ लाख मंजूर झाले होते. दुसरा प्रस्ताव २०१२ मध्ये पाठवण्यात आला तेव्हा ५.८५ कोटी रुपये मंजूर झाले. तिसरा ३२.१९ कोटी रुपयांचा प्रस्ताव २०१७ मध्ये पाठवण्यात आला होता. त्यातून १० कोटी रुपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून आणि १० कोटी रुपये वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून मंजूर झाले होते. सन २०१८ मध्ये १६६.७९ कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यावर महाराष्ट्र शासनाने सन २०२२ मध्ये प्रस्ताव सुधारित करून देण्याचे आदेश मिळाले. त्यानुसार सन २०२३ मध्ये ३६८.७१ कोटी रुपयांचा सुधारित प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.