आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Sweet Bitter 'Pachcheda' Means To Face Happiness And Sorrow In New Year, Get Strength To Digest The Mixture Of Happiness And Sorrow | Marathi News

गुढीपाडवा:गोड-कडू ‘पच्चेडा’चा अर्थ नववर्षात सुख-दु:खाला सामोरे जा, सुख-दु:खांचे मिश्रण पचवण्याची ताकद मिळावी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुढीपाडव्याला तेलुगु भाषिक ‘उगादी पंडुगा’ म्हणतात. या दिवशी ‘पच्चेडा’(घोलाना) तयार करून पिण्याची परंपरा त्यांनी जपली. आंबट, तिखट, गोड अन् कडू असा हा काढा पिण्यामागे मानवी जीवनाचा अर्थ दडलेला आहे. शिवाय उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा मंत्रही. अर्थ असा- नवीन वर्ष सुरू झाले तरी गोड अन् कडू दिवस वाट्याला येणारच. म्हणजेच सुख-दु:खांचे मिश्रण पचवण्याची ताकद मिळावी. आरोग्याचा मंत्र असा की, या काढ्यात कडूलिंबाची फुले, गूळ, चिंच व फळांचा रसही असतो. त्याने उन्हाळ्यात थंडावा मिळतो.

असा होतो पच्चेडा
नव्या मडक्यात चिंचेचे पाणी घ्यायचे. त्यात कडुलिंबाची फुले, किसलेली कैरी, तिखट, गूळ, मीठ, चिंच, फुटाणे, कलिंगड आणि काकडीचे तुकडे टाकायचे. मडक्याच्या तोंडापर्यंत हा रस तयार करायचा. हे मडके पाटावरील तांदळात ठेवायचे. त्याला लिंबाच्या फांद्यांनी तयार केलेला हार घालायचा. वरून साखर हार. कुटुंबातील सर्वांनी एकत्र येऊन त्याची पूजा करायची. त्यानंतर सर्वांनी ते प्यायचे. आयुर्वेदात या काढ्याचे महत्त्व सांगितलेले आहे. तो मानवी आरोग्यास आरोग्यदायी आणि उत्साहवर्धक असल्याचे म्हटले आहे.

यंदा सामूहिक सण
भावनाऋषी पेठेतील पंचमुखी हनुमान देवस्थानच्या परिसरात यंदा सामूहिक पच्चेडा सेवनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्षे हा कार्यक्रम झालेला नाही. यंदा मोठ्या उत्साहाने त्याचे आयोजन केले आहे. नवीन पंचांग वाचून उपस्थितांना पच्चेडा देण्यात येईल.

मांगल्याचा दिन
या नववर्षाचे स्वागत करताना घरासमोर रांगोळी काढली जाते. आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. नवीन वस्त्रे परिधान करून भगव्या ध्वजाचे पूजन होते. पहाटे वसंत ऋतूची चाहूल लागते. कोकिळेच्या मधुर स्वराने वातावरणात उत्साह संचारतो. या दिवशी झाडांना नवीन पालवी फुटते. निसर्गात प्रसन्नता बहरते. त्यामुळे या दिवसाला मांगल्य दिन असेही म्हटले आहे. रंगपंचमी ते गुढीपाडव्यापर्यंत शुभ दिवसच असतात. या कालावधीत तेलुगु भाषिक नवे जावई, सूनबाई आणि नातवंडांना खोबऱ्याचे हार घालून आनंद साजरा करतात.
सत्यनारायण गुर्रम, पद्मशाली ज्ञाती संस्थेचे विश्वस्थ

बातम्या आणखी आहेत...