आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उस्मानाबाद जिल्ह्यातील भयंकर प्रकार:उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून पत्नीच्या पावित्र्याची घेतली परीक्षा

परंडा7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ लावण्याचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. पण, समाजात आजही अशा कुप्रथा पाळल्या जातात, त्याविरुद्ध जनजागृती करणे हा यामागचा हेतू आहे
  • महिला 4 दिवस घराबाहेर, दोन जणांनी केला अत्याचार

उकळत्या तेलातून नाणे काढण्यास सांगून पत्नीच्या पावित्र्याची परीक्षा घेण्याचा अघोरी प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात परंडा तालुक्यात समोर आला आहे. पारधी समाजातील या दुर्दैवी महिलेची चित्रफीत सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे परंडा येथे ११ फेब्रुवारी राेजी घराबाहेर पडलेल्या या महिलेवर एका पोलिसासह दोन जणांनी अत्याचार केल्याची माहितीही समोर आली आहे. चार दिवसानंतर तिला घरी सोडल्याने पतीने तिच्या पावित्र्याची परीक्षा घेतली. दरम्यान, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याची गंभीर दखल घेतली असून दोषींविरोधात कडक कारवाई करण्याची मागणी गृहमंत्र्यांकडे केली आहे.

स्थानिक पोलिसांनी बातमीची गंभीर दखल घेत कारवाई केली. महिलेचा आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी दोन पथख नेमले. परंतु, महिला आणि पुरुष दोघेही गायब आहेत. त्यांना शोधून काढल्यानंतरच संपूर्ण प्रकरण समोर येईल. व्हिडिओ लावण्याचा हेतू कुणाच्याही भावना दुखावण्याचा नाही. पण, समाजात आजही अशा कुप्रथा पाळल्या जातात, त्याविरुद्ध जनजागृती करणे हा यामागचा हेतू आहे.

ही घटना जेवढी भयानक आणि अस्वस्थ करणारी आहे तेवढेच भयानक व दाहक वास्तव या घटनेच्या मुळाशी आहे. या घटनेची चित्रफीत तिच्या पतीनेच सोशल मीडियावर टाकली होती. ही घटना आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील परंड्यातील एका झोपडपट्टीमधील. १६ फेब्रुवारी ती घडली. जबरदस्ती करताना दिसणारा चित्रफितीमधील मनुष्य त्या महिलेचा नवरा आहे. भाड्याच्या चारचाकी गाडीवर चालक म्हणून तो काम करतो. त्याचे नाव अप्पाशा व त्याची बायको कुशा (दोघांची मूळ नावे बदलली आहेत.) माहेरी जाण्यावरून ११ फेब्रुवारीला नवरा-बायकोमध्ये किरकीर झाली. त्यानंतर कुशा उस्मानाबादमधल्या आपल्या आई-वडिलांकडे ११ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी निघाली. परंड्यातल्या खासापुरी चौकात उभी असताना एक जण तिला मोटारसायकलीवरून जबरीने घेऊन गेला. त्याने तिला उसाच्या रानात नेले. त्याने व परंडा पोलिसमधील एका पोलिसाने तिच्यावर दुष्कर्म केले. चार रात्री, चार दिवस हा प्रकार चालू होता. दरम्यान, तिचा नवरा अप्पाशा हा तिला सगळीकडे शोधत फिरत होता.

उस्मानाबादमधील सिव्हिल हॉस्पिटल, बायकोच्या माहेरी आदी ठिकाणी तिचा शोध घेतला. १५ फेब्रुवारी रोजी कुशाला सोडून देण्यात आले. कुणाकडे याची वाच्यता केली तर तुम्हा दोघा नवरा-बायकोला पेट्रोलने जाळून टाकू, असा दमही त्यांनी दिला. पत्नी घरी आल्यानंतर अप्पाशा तिला सतत विचारत होता- एवढे दिवस तू कुठं होतीस? हे तो खोदून-खोदून विचारत होता. त्या दोघांनी तुझ्याबरोबर काय केले? असे तो विचारत होता. पण दोघा जणांनी केलेल्या दमबाजीमुळे कुशा नवऱ्याला काही सांगत नव्हती. काहीच केले नाही, असे म्हणत होती. तेव्हा खरे काय आणि खोटे काय हे तिच्याकडून वदवून घेण्यासाठी १६ फेब्रुवारी रोजी अप्पाशाने उकळत्या तेलातून नाणे काढण्याचा अघोरी प्रकार केला. स्वत:चा व नवऱ्याचा जीव वाचावा म्हणून कुशा खरे काही सांगत नव्हती.तिने खरे बोलावे म्हणून तो प्रयत्न करत होता. हा प्रकार चालू असताना स्वत: नवरा चित्रफीत तयार करत होता. नंतर त्याने ती चित्रफीत सोशल मीडियावर टाकली.

पारधी समाजातील प्रथा

पारधी समाजामध्ये याबाबतची प्रथा आहे. खरे बोलत असलेल्या महिलेने देवाचे नाव घेऊन उकळत्या तेलातून नाणे काढले तर तिला काही होत नाही. ती खोटे बोलत असेल तर तिला पोळते व तेलातून जाळ निघतो असा समज पारधी समाजात आहे. त्यातूनच ठिकठिकाणी असे प्रकार घडत असतात. ‘पारधी समाजातील भावांनो-बहिणींनो, मी बायकोला तेलात हात घालायला का लावतोय हे तुम्हाला सांगतो, असे म्हणत त्याने सर्व कहाणी पारधी भाषेत बोलून दाखवली आहे. तो माणूस व पोलिस मला फक्त घेऊन गेला. काहीच केले नाही, असे बायको सांगते. तिने खरे सांगावे यासाठी हे करत असल्याचे त्याने चित्रफितीमध्ये म्हटले आहे.

डॉ.नीलम गोऱ्हेंकडून दखल

सामाजिक कार्यकर्त्या सुनीता भोसले याना आलेला हा व्हिडिओ शनिवारी दुपारी त्यानी साेशल मीडियावर टाकून यातील दोषींची माहिती देण्याचे आवाहन केले. व्हिडिओतील गंभीर प्रकार पाहून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी ताे व्हिडिआे विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडे पाठवला. त्याची दखल घेऊन डॉ. गोऱ्हे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क साधून तपासाची मागणी केली.

पारधी समाजातील महिलांचा छळ

पारधी समाजातील पुरुषाला पकडायचे व नंतर त्याला सोडवण्यासाठी महिलांचा छळ करायचा असे प्रकार चालतात. उकळत्या तेलातून नाणे काढण्याचा प्रकार गैरच आहे. पण या प्रकरणाकडे केवळ तेवढ्यापुरते न बघता हा प्रकार कशातून झाला, याचा शोध घेत त्याच्या मुळाशी गेले पाहिजे. सरकारने यासंदर्भात चौकशी करून संबंधितांवर कडक कारवाई करावी.’ - ज्ञानेश्वर भोसले, अध्यक्ष, भारतमाता आदिवासी पारधी समाज प्रतिष्ठान, सोलापूर.

बातम्या आणखी आहेत...