आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम बंद:सोलापूरचा यंत्रमाग उद्योग येणार अडचणीत

सोलापूर5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील टेक्स्टाईल उद्योगाला अत्यंत उपयुक्त मनुष्यबळ पुरवणारा शासकीय तंत्रनिकेतनमधील टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग हा पदविका अभ्यासक्रम बंद करून स्थानिक यंत्रमाग उद्योगाला अडचणीत आणण्याचा प्रकार झाला आहे.

प्रत्यक्षात 'टेक्स्टाईल' विषयावर एकापेक्षा अधिक अभ्यासक्रम सुरू करणे गरजेचे असताना, सुरू असलेला एकमेव अभ्यासक्रमही बंद केल्याने या क्षेत्रातील केंद्र व राज्य सरकारच्या विकासाच्या धोरणाला विसंगत भूमिका समोर आली आहे.

राज्य शासनाने महाराष्ट्रात दोन ठिकाणी शासकीय तंत्रनिकेतनमध्ये टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यामध्ये नागपूर व सोलापूरचा समावेश होता. त्यापैकी सोलापूर शहरातील टेक्स्टाईल उद्योग हा टेरी टॉवेल उत्पादनातून सर्वाधिक निर्यात मिळवून देणारा ठरतो. तसेच, सोलापुरी चादर देश-विदेशात लोकप्रिय आहे. त्यामुळे या पदविकेला सोलापुरात मोठी मागणी व रोजगाराची संधी उपलब्ध होती. यातून सोलापूरच्या स्थानिक कुशल मनुष्यबळाची गरज भागवली जाते. राज्यातील टेक्स्टाईल उद्योगाचे केंद्र असलेल्या इचलकरंजी टेक्स्टाईल हबमध्ये खासगी संस्थांकडून हाच पदविका अभ्यासक्रम चालवला जातो. एवढेच नव्हे, तर पदविका अभ्यासक्रमासोबत फॅशन डिझायनिंग व टेक्स्टाईल प्रोसेसिंग हे अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत. सोलापूरला पदविका घेतलेले काही विद्यार्थी इचलकरंजीत जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत आहेत.

मध्यंतरी एआयसीटीई या केंद्र सरकारच्या तंत्रशिक्षण संस्थेने पदविकेस प्रवेश मिळत नसल्याच्या कारणाकरून पदविका अभ्यासक्रमच रद्द ठरवला. प्रत्यक्षात राज्यात केवळ दोनच ठिकाणी म्हणजे नागपूर व सोलापूर येथे असलेली टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग पदविका शिक्षण स्थानिक गरज न पाहाता रद्द केली. आता सोलापुरातील टेक्स्टाईल हबसाठी पूरक अभ्यासक्रमच शिल्लक राहिलेला नाही. यावर्षी प्रतीक्षा यादीतील 50 विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी प्रवेशाची तयारी दाखवली, तरी ही पदविका बंद केल्याने प्रवेश मिळाला नाही. शेवटी त्यांना प्रवेश न घेताच परतावे लागले. मागील तीन वर्षांत सर्वच पदविका अभ्यासक्रमांचे प्रवेश कमी झाले होते. हा निकष सरसकटपणे राज्यात केवळ दोनच ठिकाणी असलेल्या टेक्स्टाईल मॅन्युफॅक्चरिंग अभ्यासक्रमाला लावला गेला.

बातम्या आणखी आहेत...