आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुंतागुंत वाढली:चिमणी, विमान दोन्हीसाठीची आंदोलने तूर्तास सुरूच राहणार

साेलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विमानसेवा आणि चिमणीच्या मुद्द्यावरून सुरू असलेली दोन्ही आंदोलने इतक्यात संपण्याची चिन्हे नाहीत. सोलापूर विकास मंचने सुरू केलेले आंदोलन सोमवारपर्यंत सुरू राहणार आहे. त्यानंतर चर्चा करून पुन्हा निर्णय घेण्यात येणार आहे. सिद्धेश्वर साखर कारखान्याचे सभासद आणि कर्मचाऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले आंदोलन सुरूच राहणार आहे.

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी विमानसेवेत चिमणीमुळे अडथळा येत नाही असे म्हटले तर माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी काडादींच्या बाजूने उभे राहात कारखाना बंद पाडण्याचे षड्््यंत्र असल्याचा आरोप केला.चिमणी समर्थनासाठी सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेल्या चक्री उपाेषण स्थळाला शनिवारी माजी आमदार चाकोते, माजी जि.प. सदस्य अमर पाटील यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दिला. अक्कलकोट तालुक्यातील सर्व पक्षीय नेत्यांनी कारखान्याच्या बाजूने कौल दिला.

सोलापूर विकास मंचचे आंदोलन शनिवारी सुरू होते. ५ डिसेंबर राेजी चिमणीबाबत पालिका आयुक्तांकडे सुनावणी असल्याने आंदोलन सुरूच राहणार आहे. सुनावणीनंतर पुन्हा बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे मंचचे केतन शहा यांनी म्हटले आहे. आयुक्त शीतल तेली-उगले सोमवारी दुपारी १२ वाजता सुनावणी घेणार आहेत. सुनावणीचा अहवाल न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

काडादी समाजाचे श्रद्धास्थान, कारखान्याविरुद्ध कारस्थान
सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना बंद पाडण्याचे षड्््यंत्र काहीजण करत आहेत. ऊस स्वत:च्या कारखान्याकडे नेण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. काडादी घराणे हे वीरशैव लिंगायत समाजाचे श्रद्धास्थान आहे. समाजाच्या अस्मितेला हात लावण्याचा प्रयत्न केल्यास गप्प बसणार नाही. विमानतळावरून वर्षात ३०० ते ३५० विमान उड्डाण करतात. केंद्राकडे वस्तुस्थिती मांडणे गरजेचे आहे. त्यासाठी पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यामार्फत प्रयत्न करावेत, असे माजी आमदार विश्वनाथ चाकोते यांनी म्हटले आहे.

चिमणी अडथळा नाही, माझ्या पंचाहत्तरीला २८ विमाने आली
चिमणीवरून सुरू असलेले हे सर्व निरर्थक आहे. होटगी रोड विमानतळावरून आम्ही विमानाने गेलो आणि आलो. कोठेच अडचण निर्माण झाली नाही. माझी ७५ वी साजरी झाली त्यावेळेस २८ विमाने विमानतळावर उतरली. चिमणी अडथळा वाटत नाही.

प्रवासी विमानसेवेसाठी विमान कंपन्यांशी चर्चा केली पाहिजे. ज्यांचे वजन आहे त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत, अशी भूमिका माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली आहे. सन २००२ पासून बोरामणीचे विमानतळाचे भूसंपादन केले. २०१४ पर्यंत जे केले तेवढी माहिती आहे, नंतरची नाही, असेही ते म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...