आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:प्राणिसंग्रहालयाच्या जवळील डबक्यालगत झुडपामध्ये दिसली मगर; नागरी वस्तीत तिसऱ्यांदा दिसली मगर...

सोलापूर2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुठून आल्या मगरी? महापालिका, वन विभागाचे मौन

महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयाच्या जवळील डबक्यालगत झुडपे आहेत. तेथील मोकळ्या जागेत बुधवारी (दि. १०) तब्बल चार ते साडेचार फूट लांबीची एक मगर दिसली. दुपारी चार वाजता शेळ्या राखणाऱ्याने ती मगर पाहिली. वन विभागाला घटनेची माहिती दिल्यानंतर अडीच तासानंतर कर्मचारी घटनास्थळी आले. दरम्यान, अंधार पडल्याने पथक माघारी गेले.

प्राणिसंग्रहालय परिसरातील मोकळ्या जागेत सिद्धेश्वर यात्रा कालावधीत जनावरांचा बाजार भरतो. त्या जवळच्या परिसरातून सांडपाण्याचा नाला वाहतो. त्या परिसरात शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या एक युवकास मगर दिसली. त्याने त्वरित केवल यशवंत फडतरे यांना त्याबाबतची माहिती दिली. फडतरे यांनी घटनास्थळी जाऊन त्या मगरीचे फोटो काढले. तसेच, वनविभागाला घटनास्थळी येण्याबाबत कळवले. पण, वन विभागाकडून प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, मगरीचे फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर वन विभागाला जाग आली. पण, मगर तेथील एका खड्ड्यात साचलेल्या पाण्यात गेली. अंधार पडल्याने वन विभागाचे पथक रिकाम्या हाती परतले. प्राणिसंग्रहालयाच्या जवळपास पुन्हा मगर आढळली.

: नऊ वर्षांपूर्वी महात्मा गांधी प्राणिसंग्रहालयातील पिंजऱ्याची स्वच्छता करताना फ्लॅॅशआऊटद्वारे काही पाण्यासोबत मगरीची सहा ते सात पिल्लं नाल्यात वाहून गेल्याची चर्चा होती. प्राणी संग्रहालयाचे तो दावा सुरुवातीपासून फेटाळून लावला. मग, शहरामध्ये एवढ्या मगरी आल्या कुठून? असा प्रश्न निर्माण झाला आहे. देगावच्या आेढ्यात सापडलेल्या मगरीची डीएनएची टेस्ट करुन त्याची प्राणी संग्रहालयातील मगरींशी तुलना करण्याच्या मागणीकडे वन विभागाने सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. महापालिका व वन विभागाच्या दुर्लक्षामुळे प्राणी संग्रहालयासमोरून वाहणारा नाला जणू ‘मगरपट्टा’झाल्याचे चित्र आहे.

नागरी वस्तीत तिसऱ्यांदा दिसली मगर...

प्राणिसंग्रहालय समोरील नाल्यात एक मगरीचे पिल्लू आढळले होते. नागरी वस्तीलगत ती पहिली मगर तेथील एका युवकाने पकडून वन विभागाकडे दिली होती. देगाव नाल्यात सहा महिन्यांपूर्वी दुसरी मगर पकडण्यात आली होती. आता पुन्हा प्राणिसंग्रहालय परिसरात मगर दिसली असून त्याचे फोटोही व्हायरल झाले आहेत.

अंधार झाल्याने शोधमोहीम घेता आली नाही. गुरुवारी सकाळी त्या परिसरात पिंजरे लावण्यात येतील. त्या मगरीने अद्याप कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यामुळे मगरीस पकडावे का? याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ. आय. एच. शेख, सहायक उपवनसंरक्षक

माझा भाऊ शेळी राखत होता. त्याने मगर पाहून मला हाक दिली. मी धावत गेलो. ४.५ ते ५ फूट लांब मगर पाहिली. तिचे लगेच फाेटो काढले. वन विभागाला माहिती दिली. १० मिनिटात येतो म्हणाले, प्रत्यक्षात आले अडीच तासाने. तोपर्यंत ती पाण्यात गेली होती. केवल फडतरे, सोलापूर..

बातम्या आणखी आहेत...