आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता:कवठेच्या महिला सरपंच बेपत्ता, सहा दिवस लोटले, शोध नाहीच

उत्तर सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहावा दिवस मावळला तरी कवठे, ता. उत्तर सोलापूर येथील सरपंच जैतुनबी शेख (भाभी) यांचा पोलिसांना अद्याप ठावठिकाणा लागला नाही. बुधवारपासून त्या अचानक बेपत्ता झाल्या. सर्वत्र शोधूनही सापडत नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांसह ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

या घटनेचे सविस्तर वृत्त असे : उत्तर सोलापूर तालुक्यातील कवठेच्या सरपंच जैतुनबी शेख (भाभी वय ६५) या बुधवारपासून बेपत्ता झाल्या आहेत. बुधवारी, ७ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास त्या शेळ्या चारून येते असे सांगून शेताकडे गेल्या होत्या. शेळ्या परत आल्या पण जैतुनबी शेख घरी परत आल्या नाहीत. कुटुंबातील दोन्ही मुले, पती, सुना, नातवंडांनी सर्व ठिकाणी शोध घेतला पण त्या कुठेही आढळून आल्या नाहीत. ग्रामस्थांनीही आजूबाजूच्या शेतात व इतर ठिकाणी जैतुनबी शेख यांची माहिती घेतली. त्यांचा ठावठिकाणा लागत नसल्याने सलगर वस्ती पोलिस ठाण्यात त्या बेपत्ता झाल्याची फिर्याद देण्यात आली. सलगर वस्ती पोलिस ठाण्याचे पीएसआय सचिन मंद्रूपकर हे पोलिस पथकासह गावात दाखल झाले. ज्या शेतात सरपंच भाभी शेळ्या राखायला गेल्या होत्या त्याठिकाणी जाऊन शोध सुरू केला. गावातील अनेकांचा कसून तपास केला. भाभींचा एक चप्पल सापडला होता, त्यावरून श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. पण श्वानही शेतात काही अंतरावर जाऊन घुटमळले.

गावालगत व शेताजवळच्या सर्व विहिरी, पाहुणे, इतर गावे व सभोवताल गावकऱ्यांनी पिंजून काढला आहे. सोशल मीडियावर फोटो टाकून शक्य तेवढ्या ठिकाणी पाठविले आहे. शेताच्या रस्त्याच्या बाजूच्या पाऊलवाटेला एक चप्पल आढळल्याने ग्रामस्थांनी जवळच्या विहिरीचे संपूर्ण पाणी उपसले आहे. पण शोध लागला नसल्याचे सांगितले.सरपंच भाभी जैतून शेख यांचे पती उस्मान शेख, मुलगा सरदार शेख यांची देखील पोलिसांनी विचारपूस केली. राजकीय लोकांसोबत भांडण किंवा तक्रार झाली होती का याबाबत सविस्तर माहिती घेतली. पण पोलिसांच्या हाती अजून धागा लागला नाही. लवकरच सर्व माहिती समोर येईल अशीही माहिती पोलिस निरीक्षक सचिन मंद्रूपकर यांनी दिली. सरपंच जैतुनबी भाभी अचानक बेपत्ता झाल्यामुळे कवठे परिसरात चर्चा आणि जादूटोणा किंवा भानामतीसारख्या अफवांनाही ऊत आला आहे. परिणामी गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या गायब होण्यामागे नक्की कोणते कारण आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत.

बातम्या आणखी आहेत...