आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहानगरपालिकेच्या तुळजापूर रोडवरील कचरा डेपोला बुधवारी सायंकाळी आग लागली. धुराचे लोट जेव्हा सोलापूर-धुळे महामार्गावर दिसू लागले तेव्हा अग्निशमन दलाच्या गाड्या मार्गस्थ झाल्या. दरम्यान, आगही सर्वदूर पसरली होती. आग इतकी धुमसली की २४ तासांनंतरही ती आटोक्यात आलेली नाही. ही आग आटोक्यात येण्यासाठी किमान तीन ते चार दिवस लागतील. दोन दिवसांत ६० ते ७० गाड्यांद्वारे पाण्याची फवारणी अग्निशमन दलाकडून केली केली. दरम्यान, या डेपोमुळे पसरणाऱ्या दुर्गंधी विरोधात हरित न्यायाधीकरणाकडे याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यात आता दरवर्षी किमान एकदा लागणाऱ्या आगीच्या धुरामुळे नागरिकांचे आरोग्य आणखी धोक्यात आले.
तुळजापूर रोडवर ५४ एकर परिसरात कचरा डेपो आहे. सोलापूर बायोएनर्जी व बायोमेडिकल वेस्टचा भाग वगळता सर्व ठिकाणी आग पसरली आहे. कडक उन्हामुळे कचरा पूर्णत: वाळलेला आहे. त्यातच वाऱ्याचे झोताने आग वाढत असून धुराचे लोट निघताना दिसत आहेत. ही घटना बुधवारी (ता. ४) सायंकाळी घडलेली असतानाही आग पूर्णत: विझविण्यात पालिका प्रशासन व अग्निशमन दलास दुसऱ्या दिवशी रात्रीपर्यंतही यश आले नाही. आता ज्या कचऱ्याच्या ढिगाला आग लागलेली नाही, ते जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्याचे काम सुरू आहे. आग ४३ एकरांत पसरली आहे. त्यामुळे पाण्यामुळे आग विझविणे शक्य होईना अशी स्थिती आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी आहेत. तेथील बोरचे पाणी भरून आगीवर पाण्याचा शिडकाव केला जात आहे. मुळ अगीचा स्त्रोतच माहीत नसल्याने धुराचे लोट कमी न होता वाढतच आहेत.
कचऱ्याचे वर्गीकरण नसल्याने आग
कचऱ्याचे वर्गीकरण न झाल्याने कचरा डंप केला जातो. कचऱ्यात ज्वलनशील पदार्थ असू शकतात, त्यातूनच आग लागली. पालिकेने कचरा वर्गीकरण न केल्याच्या गैरकारभाराचा पुरावाच आहे. डेपोसंदर्भात त्रिसदस्यीय समितचा अहवाल न्यायाधीकरणाकडे पुढील सुनावणी ११ जुलै राेजी होईल, असे या प्रकरणातील तज्ञ वकील असीम सरोदे यांनी सांगितले.
डेपोच्या गैरकारभारामुळे नागरिक वैतागले
डेपोतील गैरकारभार, अस्वच्छता व बेकायदेशीरता आणि पर्यावरणाला धोका या विषयावर याचिकेची गंभीर दखल घेऊन हरित न्यायाधीकरणाच्या न्या. दिनेशकुमार सिंग, डॉ. विजय कुलकर्णी यांच्या खंडपीठाने प्रतिवादींच्या विरुद्ध नोटीस जारी करून म्हणणे मागविले आहे. अॅड. असीम सरोदे, अॅड. देशपांडे, अॅड. देसाई, अॅड. टोणपे यांच्यामार्फत याचिका दाखल आहे.
पाच खासगी टॅंकरचीही घेतली जातेय मदत
आग कशामुळे लागली हे कारण समजू शकले नाही. कडक उन्हामुळे आग लागू शकते. ही आग बुधवारी सायंकाळी लागली असून त्याठिकाणी अग्निशमन दलाकडून विझविण्याचे काम सुरू आहे. आणखी आग आटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या पाच गाड्याही घटनास्थळी आहेत. खासगीच्या पाच टँकरद्वारेही पाणी पुरवण्यात येत आहे.
धनराज पांडे, उपायुक्त पालिका
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.