आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोंदवा हरकती, सूचना:सरकार विचारतेय, किराणा दुकानातूनवाइनची विक्री करायची अथवा नाही ? राज्य उत्पादन शुल्कच्या आयुक्तांनी केले आवाहन

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य सरकारने किराणा दुकान, मॉलमधून वाइन विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमबलबजावणी करण्यापूर्वी राज्य उत्पादन शुल्क विभागाने २९ जूनपर्यंत राज्यातील जनतेकडून हरकती व सूचना मागवल्या आहेत.

विरोधी पक्षांसह विविध सामाजिक संघटनांनी किराणा दुकानातून वाइन विक्री करण्यास कडाडून विरोध केला आहे. जनतेचा आणि सामाजिक कार्यकर्त्यांचा रोष लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकारने सामान्य नागरिकांना सूचना आणि हरकती दाखल करण्यासाठी स्वतंत्र ई-मेल उपलब्ध करून दिला आहे.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधी पक्षाने राज्य शासनाच्या वाइन विक्री निर्णयावर कडाडून टीका केली होती. किराणा दुकानातून सहज वाइन उपलब्ध होत राहिल्यास सर्वसामान्यांची मुले व्यसनाच्या आहारी जातील. शासनाने महसूल वाढीसाठी घेतलेला निर्णय जनतेच्या हितविरोधी असल्याने अनेक सामाजिक संघटनाही याविरोधात रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यामुळे आता शासनाने राज्यातील जनतेकडून हरकती, सूचना मागवल्या आहेत. प्राप्त हरकती व सूचना पाहून या निर्णयाची अंमलबजावणीचा निर्णय घेण्यात येणार आहे.

महसूल मिळतो म्हणून महाराष्ट्राला मद्यराष्ट्र बनवण्याला आहे हरकत
वाइन हा दारूचाच एक प्रकार आहे. किराणा दुकान हे थेट कुटुंबांना जोडलेले ठिकाण आहे. घरातील लहानांपासून महिलांपर्यंत कोणीही थेट किराणा दुकानात जातो. अशा ठिकाणीच वाइन विक्री होऊ लागली तर मद्यपींची पावले किराणा दुकानांकडे वळतील. वाइन विक्री करणाऱ्यांना दारू विक्री करण्यात संकोच वाटणारच नाही. अधिक नफा मिळेल या आशेने दारू विक्री सुरू झाल्यास सामान्य कुटुंबे उद्ध्वस्त होतील. घरांमध्ये कलह वाढतील. व्यसनामुळे घरातील कर्ता माणूस निघून गेल्याने मुले रस्त्यावर येतात. तारुण्यात विधवा होण्याची वेळ अनेक महिलांवर येते. आयुष्याची परवड होते. वाइन म्हणजे दारू नाही, असे सांगणारे सरकार तरुणांमध्ये वाइनचा प्रचार करणार की काय? हा खरा प्रश्न आहे. वाइन विक्रीला मान्यता देऊन राज्याला अधोगतीकडे नेऊ नये, यासाठी सरकारकडे हरकतींचा पाऊस पाडणे हे सजग नागरिकांचे कर्तव्य आहे. विलास कोले, सदस्य, व्यसनमुक्ती युवक संघ, महाराष्ट्र

ई-मेल, टपालाने पाठवा हरकती
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी dycomm-inspection@mah.gov.in या ई-मेलवर अथवा आयुक्त राज्य उत्पादन शुल्क दुसरा मजला, जुने जकात घर शहीद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई ४०००२३ या पत्यावर टपालाद्वारे पाठवण्याचे आवाहन उत्पादन शुल्क आयुक्तांनी केले आहे. २९ जूनपर्यंत हरकती व सूचना स्वीकारण्यात येणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...