आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:दूध संघाचे मुख्य कार्यालय केगावच्या संकलन केंद्रावर हलवणार

उत्तर सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • उत्पन्न वाढीसाठी नूतन संचालक मंडळाचा निर्णय, इतर जागा भाडेपट्ट्याने देणार, अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांची माहिती

सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे मुख्य कार्यालय केगाव येथील संकलन केंद्रावर हलवण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. रविवारी संघाचे नूतन अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संचालकांची बैठक झाली. या बैठकीमध्ये संघाच्या इतर मालमत्ताही भाडेपट्ट्याने देऊन संघाचे उत्पन्न वाढवण्याविषयी चर्चा करण्यात आली. जवळपास सहा तास चाललेल्या या बैठकीमध्ये संघाला ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी उपाययोजना करण्याविषयी चर्चा झाली.

अध्यक्षपदाच्या निवडीनंतर सोलापूर जिल्हा सहकारी दूध संघाच्या संचालकांची पहिली बैठक संघाच्या मुख्यालयात बोलवण्यात आली होती. या बैठकीला ज्येष्ठ संचालक बबनराव आवताडे यांच्यासह दोन संचालक वगळता इतर सर्व संचालक उपस्थित होते. या बैठकीमध्ये अध्यक्ष रणजितसिंह शिंदे यांनी संघ वाचवण्याच्या दृष्टीने काय उपाययोजना करता येतील? याबाबत संचालक मंडळाला माहिती दिली. शिंदे यांनी संचालक मंडळासमोर शहरातील मुख्य कार्यालय केगाव येथील संकलन केंद्रावर हलवण्याचा प्रस्ताव ठेवला. या निर्णयामागे केगाव येथील संकलन केंद्रावर होत असलेल्या अनागोंदी कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न असल्याची माहिती दिली.

संघाचे तोट्यात चालणारे वाहतूक मार्ग बंद करून सोलापूर शहरातच संघाच्या दुधाचे ग्राहक वाढवण्याबाबतही या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली. यामध्ये सर्वात जास्त चर्चेत असलेला विजापूर येथील मार्गही बंद करण्याचा निर्णय शिंदे यांनी जाहीर केला आहे. त्याचबरोबर संघाच्या कर्मचाऱ्यांबाबतही कठोर निर्णय घेण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यामध्ये संचालकांनी कुठल्याही भ्रष्ट कर्मचाऱ्याला पाठीशी घालू नये, असे आवाहन शिंदे यांनी या बैठकीत केले.

संचालक मंडळाने घेतलेले निर्णय
पंढरपूर येथील संघाची इमारत भाडेतत्त्वावर देणे.
टेंभुर्णी येथील इमारत भाडेतत्त्वावर देणे, महामार्गासमोरील जागेत २९ गाळे बांधून भाडेतत्त्वावर चालविण्यास देणे.
बार्शी येथील सध्या बंद असलेला पशुखाद्य कारखाना चालवण्यासाठी भाड्याने देणे.
राष्ट्रीय महामार्गाने केलेल्या भूसंपादनात दूध संघाच्या मंगळवेढ्यातील जागेचे ३१ लाख रुपये येणे आहेत. ते मिळवून कर्मचाऱ्यांचे वेतन देणे.
गुणवत्तापूर्ण दूध विक्रीला प्राधान्य.
इमारतींच्या भाड्यातून येणाऱ्या पैशातून संघाचा खर्च भागविणे.
गाईच्या दुधाच्या संकलन दरात दोन रुपयांची वाढ करणे.

पारदर्शी कारभाराला महत्त्व
गुणवत्तापूर्ण दुधाची विक्री करून लोकांचा विश्वास वाढवण्याचा प्रयत्न राहील. दूध संघाच्या कारभारात संगणकीय प्रणाली व ऑटोमायझेशन पद्धत वापरण्यात येईल. त्यामुळे कारभारात होणाऱ्या चोऱ्या पूर्णपणे बंद होतील. पूर्णपणे पारदर्शी कारभार करून संघाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी आम्ही जबाबदारीने काम करू.'' रणजितसिंह शिंदे, अध्यक्ष, जिल्हा सहकारी दूध संघ, सोलापूर.

केगाव, टेंभुर्णीच्या जागेवर गाळे बांधणार
केगाव, टेंभुर्णी येथील जागेवर व्यापारी गाळे बांधून ते भाड्याने देऊन संघाच्या उत्पन्नात भर घालण्याचाही प्रस्ताव त्यांनी ठेवला. त्यांच्या या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी समर्थन दिल्याची माहिती ज्येष्ठ संचालक औदुंबर वाडदेकर यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...