आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनात धाकधूक:नवप्रभाग दोन सदस्यांचे होणार? राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

सोलापूर7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इच्छुकांचे सरकारच्या निर्णयाकडे डोळे लागले

आगामी महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यांचा प्रभाग या पद्धतीने प्रारूप रचना तयार करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आपापला प्रभाग हेरून कामाला लागले आहेत. मात्र मुंबईतील नव्या घडामोडींमुळे महापालिकेचे प्रभाग दोन सदस्यीय होणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. इच्छुकांच्या मनात धाकधूक असून, डोळे सरकारच्या निर्णयाकडे लागले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची दोन सदस्यीय प्रभाग करण्याचीच मागणी होती. मातब्बर उमेदवार, मतदार संख्या व समाज यांची सांगड घालत जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणण्यासाठी दोन सदस्यीय प्रभाग रचना अनुकूल असल्याचे वरिष्ठ नेत्यांना सांगण्यात आले होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरून तीन सदस्यांचा प्रभाग करण्याचा निर्णय आला. त्यानंतरही स्थानिक नेत्यांनी फेरविचार करण्याची विनंती करत दोन सदस्यांच्या प्रभागाची मागणी केली होती. आता दोन सदस्यीय प्रभाग झाल्यास या स्थानिक नेत्यांच्या मनाप्रमाणे होणार आहे. इतर मागास वर्ग (ओबीसी) आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याबाबत न्यायालयाने स्पष्ट केले. त्यानुसार आयोगाने तयारी सुरू केली. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक नको, अशी भूमिका राजकीय पक्ष घेत आहेत. त्यामुळे सत्ताधारी महाविकास आघाडीने तसे विधेयक राज्य शासनाच्या दोन्ही सभागृहात मंजूर केले. नव्याने दोन सदस्यांची प्रभाग रचना होण्याचे संकेत मिळत असल्याने इच्छुक नगरसेवकांची घालमेल पुन्हा सुरू झाली आहे. प्रत्येक प्रभागात एक महिला व एक पुरुष असे आरक्षण असेल. नव्याने प्रभाग केल्यास प्रभागाची व्याप्ती कमी होणार आहे. यामुळे इच्छुक नगरसेवकांनी तूर्त पक्षांतर करणे थांबवले. मात्र, प्रभाग रचनेत बदलाचे आदेश आलेले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

पक्षांतर थांबवले
राज्य शासनाने निवडणूक आयोगाचे अधिकार घेतल्याने नव्याने प्रभाग रचना झाल्यास त्यात बदल होईल. त्यामुळे इतर पक्षात जाण्यास इच्छुक असलेले नगरसेवक व कार्यक्रमांनी ‘थांबा आणि पाहा’ची भूमिका घेतली आहे.

जातीचे समीकरण
दोन सदस्यांचे प्रभाग झाल्यास जातीच्या समीकरणास महत्त्व प्राप्त होईल. ज्या जातीचे मतदार जास्त त्या जातीच्या इच्छुकांना उमेदवारी देण्यावर पक्षांचा भर असेल. त्यानुसार राजकीय पक्षाकडून जातीचे समीकरण घालत त्यानुसार इच्छुकांची चाचपणी केली जात आहे.

खुल्या गटासाठी अडचण
दोन सदस्य प्रभाग झाल्यास एक महिला व एक पुरुष असे आरक्षण असेल. यात एससी, एसटीचे आरक्षण पडेल. त्यामुळे खुल्या गटासाठी महिला किंवा पुरुष असे आरक्षण पडेल. पुरुष गटासाठी एससी किवा एसटी आरक्षण पडल्यास खुल्या गटातील इच्छुकांची अडचण होणार आहे. त्यांना शेजारचे प्रभाग शोधावे लागेल.

अद्याप शासन आदेश नाही
तीन सदस्यीय प्रभाग रचना तयार करून, त्यावर सूचना व हरकती घेतल्या. त्यावर सुनावणी घेऊन रचना निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात आली आहे. त्याबाबत नवीन आदेश नाही.” -पी. शिवशंकर, आयुक्त, महापालिका

बातम्या आणखी आहेत...