आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशेतकरी, पशुपालकांनी लाडक्या पशुधनाचे ऋण व्यक्त करण्यासाठी साजरा होणारा कारहुनवी मंगळवारी शहर व परिसरात उत्साहात साजरा झाला. गाय, बैलांना लोकरीचे गोंडे, नवीन सुताचे दोरखंड, मोरकी, घुंगरपट्टा घालून सजविण्यात आले .
सीमावर्ती भागात बेंदूर
महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागामध्ये कर्नाटकी बेंदूर उत्साहात साजरा होतो. शहर व परिसरात पशुपालकांनी गाय, बैलांना सजविले होते. वर्षभर खांद्यावर ओझ वाहणाऱ्या बैलांच्या खांद्याला सोमवारी लोणी व हळद लावून खांदे मळणी करण्यात आली. गाय, बैलांना पाण्याने स्वच्छ धुवून सजविण्यात आले. मंगळवारी काहींनी जनावरांच्या अंगाला पिवळा रंग लावला होता. ग्रामीण भागात शिवारातील शेतकऱ्यांनी जनावरे एकत्रित उभी करून त्यांचा अक्षता सोहळा केला. डोक्यावर घोंगडी, खांद्यावर तीपण घेऊन जनावरांच्या भोवताली प्रदक्षिणा घालत ‘चाऊर चाऊर चेंग भल्ले...’ अशी आरोळी ठोकली. गाय-बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य देऊन त्यांची पूजा करण्यात आली.
हलगीच्या तालावर...
सोलापूर शहर, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर व मंगळवेढा तालुक्यात बैलांच्या मिरवणूक काढण्यात आल्या. ढोल ताशा, हलगीच्या तालावर पशुधनाची उत्साहात मिरवणूक निघाली होती. सलगरमध्ये येथे जिल्ह्यात मोठा कारहुनवी सण साजरा होतो. शिवारातील 100 पेक्षा अधिक बैलजोडी मिरवणूक येथे निघतात. शहरामध्ये बाळीवेस येथील शेतकरी मंडळातर्फे बैलांचे पूजन करण्यात आले. दरवर्षी मोठ्याप्रमाणावर बैलजोड्यांची मिरवणूक काढण्यात येत आहे.
गाढवांना लसीकरण
कारहूनवणी निमित्ताने गाढवाची स्वछता करून त्यास रंगाद्वारे सजवण्यात आले होते. गाढवाचे पालक त्याच्या पशुधनाचे पूजन करतात,मिरवणूकही काढतात. याच सणाचे औचित्य साधून ब्रुक इंडिया व पशुसंवर्धन विभाग सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूर शहरात धनुर्वात रोग लसीकरण करण्यात आले. या शिबिरात 100 पेक्षा जास्त गाढवांचे लसीकरण करण्यात आले.
पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. नानासाहेब सोनवणे, निबर्गी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. सत्यजीत पाटील, यांनी उपस्थित राहून लस पुरवठाही केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.