आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:सोलापूरच्या मूर्तिकाराने साकारला कमलपुष्प चूर्ण अन् कापरापासून औषधी गणेश; वाढत्या प्रदूषणात जल आणि वायू प्रदूषण रोखण्यात होईल मदत

सोलापूर4 महिन्यांपूर्वीलेखक: अश्विनी तडवळकर
  • कॉपी लिंक
  • कोरोनामुळे बंधने, उत्साह मात्र कायम

सोलापूरचे युवा मूर्तिकार विनायक घाटगे यांनी कोरोना अन् पर्यावरणाचे भान राखत औषधी गणेशमूर्ती साकारली आहे. यामुळे जलप्रदूषण आणि वायू प्रदूषण रोखण्यास मदत होणार असल्याचे मत विनायक यांनी व्यक्त केले. शाडू लाल मातीतून या औषधी गुणांचा वापर करत त्यांनी गणेशमूर्ती साकारण्याचे काम हाती घेतले आहे. यात नागकेशर चूर्ण, कमलपुष्प चूर्ण व भीमसेनी कापूर याचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने पर्यावरणपूरक आणि पर्यावरणाचा संरक्षक असा औषधी गणेश्वर यंदा सोलापुरात साकारला जाणार आहे.

या औषधी गणेशमूर्तीमुळे जलशुद्धी आणि वायू शुद्धीकरण हे दोन महत्त्वाचे फायदे होणार आहेत. शिवाय मानवाला आणि निसर्गाला हानी पोहोचणार नाही याची पूर्णपणे काळजी घेण्यात आली आहे. या गणेशमूर्तीची किंमत ३०० पासून आपल्याला हव्या त्या रकमेत आणि हव्या त्या आकारात उपलब्ध असणार आहे. घाटगे यांनी या औषधी गणपतीसाठी वाचन आणि संवाद यावर काम करून हा गणेशा साकारला आहे. मूर्ती हातात घेतल्यावर त्याच्या औषधी गुणांची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही. शिवाय याचा सुगंध मोहित करणारा आहे. भीमसेनी कापूर हा वायू शुद्धीकरणाचे काम करतो, तर कमलपुष्प चूर्ण हे जलशुद्धीकरण आणि नागकेशर हे प्रतिकारशक्तीकरिता उपयुक्त आहे.

मातीच्याच गणेशाला मागणी
यंदाच्या वर्षी अगदी छोट्या आकारांपासून मोठ्या आकारामध्ये बाजारात कोकणच्या लाल मातीपासूनदेखील पर्यावरणपूरक गणपती साकारले आहेत. काही मूर्तिकारांनी तुळशी बीज घालून गणेशाचे रूप साकारले आहे. शिवाय भाविकांचा यंदा लाल माती, शाडू याने साकारलेल्या गणपती विकत घेण्यावर भर आहे. शिवाय कोकणातील लाल रंगाचा गणपती दिसायला अतिशय आकर्षक आणि पर्यावरणपूरक असल्याने यंदा याही प्रकाराला अधिक मागणी आहे.

कोरोनामुळे बंधने, उत्साह मात्र कायम
कोरोनामुळे उत्सवांवर काही बंधने असली तरी उत्साह कायम आहे. औषधी गणेश साकारण्याचा विचार केला. त्यानुसार नागकेशर चूर्ण, कमलपुष्पचे वर्णन आणि भीमसेनी कापूर यांच्या मिश्रणातून साध्या मातीतून गणेशाचे रूप साकारले आहे. जलशुद्धीकरण, वायू शुद्धीकरण होण्यास मदत होईल . विनायक घाटगे, युवा मूर्तिकार

पारंपारिक आयुर्वेदिक औषधींचा वापर
नागकेशर आणि कमलपुष्प चूर्ण व भीमसेनी कापूर या पारंपरिक आयुर्वेदिक औषधी आहेत. याने वायू शुद्धीकरण आणि जल प्रदूषणाची हानी होणार नाही. डॉ. शिवरत्न शेटे, आयुर्वेदतज्ज्ञ

बातम्या आणखी आहेत...