आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील अनेक भागामध्ये पडणाऱ्या काजळीमुळे सोलापूरकरांना आरोग्याची काळजी सतावतेय. ती काजळी सिद्धेश्वर कारखान्याची नसल्याचा दावा माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना केला. दरम्यान, ती काजळी नेमकी उडतीय कोठून? यासह निर्माण झालेल्या प्रदूषणावर नियंत्रणाची ठेवण्याची जबाबदारी असलेल्या येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी गेल्या काही दिवसांपासून बेपत्ताच आहेत. त्यामुळे काजळीवरून सोलापूरकरांची काळजी वाढली आहे.
जुळे सोलापूर, सोरेगाव, नई जिंदगी, सैफुल, नेहरू नगर, सातरस्ता, दक्षिण व उत्तर कसबा परिसरात हवेतून काजळी पडत आहे. वाळत घातलेले कपडे काळवंडत आहेत. मागील आठवड्यात येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपसंचालक अजितकुमार पाटील हे बैठकीच्या निमित्ताने बाहेर गावी असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा मोबाइल नंबर स्वीच ऑफ आहे. काही दिवसांपूर्वी विचारले असता, ते पुणे येथे बैठकीसाठी गेले असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी दुपारी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात फक्त दोनच कर्मचारी उपस्थित होते. आता उपसंचालक पाटील हे बैठकीच्या निमित्ताने मुंबईला गेले असल्याचे सांगण्यात आले.
संवेदनशील विषय, वरिष्ठ कार्यालयातून ताकीद
संचालक पाटील यांचा मोबाइल काही क्षणासाठी सुरू झाला, त्यावेळी संपर्क साधला असता, ‘‘सिद्धेश्वर कारखान्याच्या संदर्भात तुम्ही प्रश्न विचारण्यासाठी फोन केला असल्यास, तो विषय संवेदनशील असल्याने माझ्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्यांनीच त्यासंदर्भात बोलण्याचे वरिष्ठ कार्यालयाचे निर्देश आहेत, तुम्ही पुणे विभागीय अधिकाऱ्यांना संपर्क करा’, असे सांगून फोन स्वीच ऑफ केला.
बँक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई होऊ शकते
गेल्या महिनाभरापासून (एसपीएम) अतिसूक्ष्म धुलिकणांचे शहरातील प्रमाण वाढले आहे. त्याचे आदर्श प्रमाण १०० (मायक्रोग्रॅम परमीटर क्यूब) असते. स्टॅक मॉनेटरिंग केल्यास नेमके धुलिकणांचे प्रमाण अचूक कळते. उद्योजकांनी मान्यताप्राप्त लॅब कडून स्वत:हून ते करून घ्यायला हवं. तसेच, प्रदूषण नियंत्रण मंडळांनी ते करणे अपेक्षित असते. प्रदूषण झाल्याचे निश्चित झाल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये संबंधितांना नोटिस देणे, त्यांची बँक गॅरंटी जप्त करण्याची कारवाई होऊ शकते, असे प्रदूषण नियंत्रण मंडळातील सूत्रांनी सांगितले.
शेतातील पाचट जाळल्याने काजळी पसरत नाही
दरम्यान, शहराच्या विविध भागांमध्ये पसरणाऱ्या काजळी संदर्भात एका ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले, “धुराड्यात काजळी, छोटे कण चिमणीतच खाली पडण्यासाठी स्वतंत्र यंत्र बसवण्यात येते. त्यास स्क्रबर, बॅग हाऊसही म्हटले जाते. ते खूप महागडे असून व्यवस्थित बसवले नसेल किंवा सुमार दर्जाचे असल्यास काजळी दूरवर हवेत उडते. शेतात उसाचे पाचट जाळल्यामुळे काजळी पसरणे शक्य नाही, असेही त्यांनी सांगितले.
तपासणीचा आदेश देऊ
काजळी संदर्भातील विषय आम्हाला तुमच्याकडून समजला आहे. त्यासंदर्भात क्षेत्रीय अधिकाऱ्यांना तपासणीचे आदेश देतो. चार दिवसांनंतर त्यासंदर्भातील अहवाल आल्यानंतर त्याबाबत सांगू.’’-शंकर वाघमारे, विभागीय अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.