आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीटूचे नेते काॅम्रेड मधुकर पंधे यांनी १९८५ मध्ये विचारले हाेते, ‘साेलापूरकर काेटणीसांना विसरले काय?’ या एका सवालानंतर आंतरराष्ट्रीय मानवतावादी डाॅ. द्वारकानाथ काेटणीस यांच्या स्मारकासाठी प्रयत्न सुरू झाले. तब्बल २५ वर्षांच्या पाठपुराव्यानंतर २०११ मध्ये स्मारकाचे उद््घाटन झाले. जणू ते स्मारकच त्यांच्या सवालाचे उत्तर झाले. तपपूर्तीकडे वाटचाल असलेल्या या स्मारकाविषयी स्मारक समितीचे सदस्य रवींद्र माेकाशी यांनी आठवणी जागवल्या. डाॅ. काेटणीस यांचा ९ डिसेंबरला ८० वा स्मृतिदिन. त्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी २५ वर्षांचा प्रवास उलगडला.
भाई छन्नुसिंह चंदेलेंकडून मिळाले आर्थिक पाठबळ
‘‘काॅ. पंधे चीनहून मायदेशी आले हाेते. साेलापूरला अभिमान असलेल्या डाॅ. काेटणीसांविषयी भरभरून बाेलताना ते म्हणाले, की त्यांचे स्मारक उभे करा. भय्या चाैकातील त्यांचे राहते घरच स्मारक करण्याचा निर्णय झाला. स्मारक समिती गठित झाली. माझ्यासह प्रा. फ. ह. बेन्नूर, ए. बी. राजमाने, शंकर पाटील, अरुणकुमार इंगळे यांचा त्यात समावेश झाला.
महापाैर त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतील, असेही ठरले. काॅ. पंधे यांनी सांगितल्यानुसार चीनहून एक शिष्टमंडळ साेलापूरला आले हाेते. कार्यक्रमाचे नियाेजन करण्यासाठी स्वातंत्र्यसेनानी भाई छन्नुसिंह चंदेले यांची भेट घेतली. त्या वेळी त्यांची दृष्टी गेलेली हाेती. तरीही त्यांनी जंगी कार्यक्रम करण्यासाठी आर्थिक पाठबळ दिले. तेव्हाचे महापाैर प्रा. पुरणचंद्र पुंजाल यांनी संपर्क साधून हुतात्मा स्मृती मंदिर देण्यास सांगितले. पैसे मिळवण्यासाठी मी आणि भाई चंदेले रिक्षातून फिरलाे. कार्यक्रमानंतर दरवर्षी स्मृती दिन सुरू झाला. स्मारक उभारण्याची चळवळ सुरू झाली.’’
अकलूज शेतकरी मेळाव्यात विलासरावांनी घाेषणा केली
डाॅ. काेटणीस यांचे राहते घर ताब्यात घेऊन स्मारक करण्याचा निर्णय झाला. त्या वेळी पाटील चाळीतल्या रहिवाशांचा प्रश्न निर्माण झाला. प्रकरण उच्च न्यायालयात गेले. नियाेजित स्मारकाला स्थगिती मिळाली. त्यानंतर स्थगिती उठवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. दरम्यान, नलिनी चंदेले महापाैर झाल्या. त्यांनी स्थगिती उठवण्यासाठी पुढाकार घेतला. स्थगिती उठवली.
जागा ताब्यात मिळाली. परंतु महापालिकेकडे पैसे नव्हते. याच दरम्यान, अकलूज येथे शेतकरी मेळावा हाेता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख येणार हाेते. भाई गणपतराव देशमुख, बाबा कारंडे या मंडळींनाही निमंत्रण हाेते. त्यांच्यासह महापाैर चंदेले यांनी या मेळाव्यात काेटणीस स्मारकासाठी निधी देण्याची मागणी मांडली. मुख्यमंत्री देशमुख यांनी त्याची घाेषणा करताना स्मारकाला निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले. त्यानंतर अडीच काेटींचा निधी आला. त्यातूनच एक एकर जागा संपादित करताना, रहिवाशांचे पुनर्वसनही झाले. २०११ मध्ये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्मारकाचे उद््घाटन केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.