आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुस्कटदाबी:आपण सारे भारतीय असल्याचा विचार बाजूला पडला असून माणसांची मुस्कटदाबी होत आहे

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकारणी लोक जात पाहिल्याशिवाय कार्यकर्ते किंवा लोकांना जवळ करत नाहीत. महाराष्ट्राला थोर महापुरुष व संताच्या विचारांचा वारसा लाभला आहे. जातीपातीच्या पलीकडे पाहण्याची गरज आहे. आपण सर्व भारतीय आहोत हा विचार बाजूला पडला असून माणसांची मुस्कटदाबी होत आहे. राजकारण हे विनाशी तर साहित्य हे अविनाशी आहे. देशाला जोडण्याचे व राष्ट्र बांधणीमध्ये साहित्याचे महत्त्वाचे योगदान अाहे. असे प्रतिपादन पानिपत कार विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.

२५ व्या मराठी जैन साहित्य संमेलनाचे उद्घाटन हुतात्मा स्मृती मंदिरात शुक्रवारी श्री.पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

मंचावर स्वागताध्यक्ष मिलिंद फडे, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, प्रा डाॅ. सदानंद मोरे, संजीव पाटील, सुरेखा शहा, सरिता कोठाडीया, राजकुमार शहा आदी उपस्थित होते. याप्रसंगी गाथा कर्मवीरांची, विचारमंथन व्यक्तिवेध, शोध भारत नावाचा आदी ग्रंथांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

प्रा. सदानंद मोरे म्हणाले की, सोलापुरात तिसऱ्यांदा जैन साहित्य संमेलन होत आहे. शहराला साहित्याची परंपरा आहे. वैचारिक दिशा देण्याचे कामही साहित्याच्या माध्यमातून होत आहे. जैन समाजाने स्थानिक भाषा स्वीकारून त्या भाषेचे उदात्तीकरण, प्रतिष्ठा वाढवली आहे. श्री. फडे यांनी स्वागत केले. सुवर्णा कटारे व सोनम पाटील यांनी सूत्रसंचालन केले. केतन शहा यांनी आभार मानले.

जैन समाजाच्या जगण्याचे प्रश्न साहित्यात यावेत : संमेलनाध्यक्ष रावसाहेब पाटील
महाराष्ट्रातील जैन लोकांचे प्रश्न, समस्या व मराठी जैन समाजाची अस्मिता याबाबत फारच कमी लिहिले जाते. जैन समाजाच्या मानसिकतेचे, जैन शेतकऱ्यांचा समस्या, व्यापारी-शिक्षण यावर साहित्यामध्ये वास्तवाला धरून लिखाण असायला हवे. तसेच विज्ञान व तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे दाराशी अालेल्या सुखाची चटक वाढली आहे. आयात, पैसा, श्रम न करता भरपूर संपत्ती मिळवण्याची जुगारी प्रवृत्ती वाढली आहे. प्रामाणिक कष्ट हे ओझे वाटू लागले आहे. विद्यार्थ्यांना श्रमातून कमावलेले वैभव हेच खरे वैभव असते हे सांगण्याचे धाडस पालकांना राहिले नाही. मुलांच्या मनाविरुध्द त्यांच्यावर शिक्षण लादले जाते. शिक्षणाबरोबर इतर ज्ञानही तितकेच महत्त्वाचे असून पालकांनी याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन संमेलनाध्यक्ष डाॅ. रावसाहेब पाटील यांनी केले.

विमानसेवा नसलेल्या सोलापूरची अवस्था
पावसात भिजणाऱ्या चिमणीच्या घरट्यासम पानिपतकार विश्वास पाटील हे उद्घाटक होते. त्यांच्या सोबतची पाहुणे मंडळी मात्र अनुपस्थित होती. त्याचे कारण सांगताना पाटील म्हणाले, ‘मी खोटे बोलणार नाही. जी मंडळी येणार होती ती सोलापूरला विमानसेवा नसल्याने आलेली नाही. विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी पाडा अथवा पाडू नका, मात्र सोलापूरकरांना पावसात भिजणाऱ्या चिमणीच्या घरट्यासारखे अधोगतीचे दिवस आलेले आहेत हे लक्षात घ्या. त्यांना गरुडासारखे उंच उडावयाचे असल्यास विमानसेवा हवी. सोलापूरच्या शेजारी असलेल्या विजयपूर, गदग, कलबुर्गीला विमानसेवा मिळते. मग या शहरातील माणसे गप्प कशी?

बातम्या आणखी आहेत...