आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:आमदार निधीतून उभारले जाणारे पंढरीतील यात्री निवास तप उलटले तरी अर्धवटच

नवनाथ पोरे | पंढरपूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • २ कोटी ४ लाख रुपये खर्च केल्यानंतर निधीअभावी १३ वर्षांपासून रखडला प्रकल्प, बांधकामही बंद

पंढरपुरात येणाऱ्या विठ्ठलभक्तांची राहण्याची सोय व्हावी म्हणून राज्यातील सर्वपक्षीय आमदारांच्या निधीतून बांधण्यात येत असलेल्या आमदार यात्री निवासाचे बांधकाम तब्बल १३ वर्षांपासून रखडले आहे. २ कोटी ४ लाख खर्च केल्यानंतर निधीअभावी हे बांधकाम बंद आहे. आता ते पूर्ण करून हस्तांतरणासाठी बांधकाम विभाग व श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती यांच्यात टोलवाटोलवी सुरू आहे. विशेष म्हणजे राज्य विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी ६ वर्षांपूर्वी लक्ष घालूनही या कामाला गती आलेली नाही. २००४-०५ मध्ये राज्यातील सर्व आमदारांनी निधी देऊन एक आमदार यात्री भवन उभा करण्याचा निर्णय घेतला होता. विधान परिषद आणि विधानसभेतील ३६६ पैकी ६३ आमदारांनी प्रत्येकी २ लाख ते १० लाख रुपये या प्रमाणात निधी दिला. यातून २ कोटी ४ लाख रुपये निधी उपलब्ध झाल्यानंतर मंदिर समितीच्या सर्व्हे नंबर ५९/१ मध्ये २००९ मध्ये बांधकाम सुरू झाले. बेसमेंट, तळमजल्याचे काम पूर्ण झाल्यानंतर मात्र निधीअभावी हे काम बंद आहे.

२ कोटींचा खर्च पाण्यात, हस्तांतरणासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि विठ्ठल मंदिर समितीची टोलवाटोलवी नव्यानेच सर्व बांधकाम करण्याची आता वेळ २५ एप्रिल २०२२ रोजी गोऱ्हे यांनी बांधकामाची पाहणी केली. अपूर्ण बांधकामाच्या इमारत मंदिर समितीकडे हस्तांतरित करण्याची सूचना केली. मंदिर समितीने मात्र टाळाटाळ केली. ही अर्धवट इमारत आता दुरुस्त करून वापरण्यायोग्य राहिलेली नाही. ती पूर्णपणे पाडून नव्याने बांधकाम करावे लागणार आहे, असा दावा मंदिर समिती करत आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार इमारत दुरुस्तीनंतर वापरायोग्य आहे.

दोन वेळा झाले बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट
नीलम गोऱ्हे यांनी २०१७ मध्ये विधान परिषदेत एक लक्षवेधी मांडली होती. त्यानंतर २०१८ मध्ये इमारत मंदिर समितीकडे हस्तांतर करण्याची मागणी होऊ लागली. समितीने २०१८ मध्ये बांधकामाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले. मंदिर समितीच्या मागणीनुसार सार्वजनिक बांधकाम विभागानेही शासकीय एजन्सीद्वारे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले.

अशी आहे बांधकामाची स्थिती
{ १३ जानेवारी २००९ रोजी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली. काम पूर्ण करण्याची मुदत २४ महिन्यांची होती. १३ वर्षांनंतरसुद्धा बांधकाम अपूर्ण.
{ सोलापूरच्या बांधकाम कंपनीला हे काम अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा १५.२५ टक्के वाढीव दराने देण्यात आले. २ कोटी खर्च झाल्यानंतर काम थांबले.
{ या बांधकामात आता डुकरे, कुत्री यांचा वावर असतो. तळमजल्यात ३६५ दिवस पाणी भरलेले असते.
{ पहिल्या मजल्यातील डॉरमेंटरी खोल्यांचा मंदिर समितीने आता यात्रेच्या काळात गोदाम म्हणून वापर सुरू केला आहे.

३६६ पैकी ६३ आमदारांचाच निधी
विधानसभा व विधान परिषदेतील आमदारांची एकूण संख्या ३६६ आहे. २८८ मतदारसंघांतून भाविक पंढरीत येतात. त्यांच्या सोयीसाठी यात्री निवास उभा करण्यासाठी निधी देताना मात्र दर्शनासाठी पदाधिकारी-कार्यकर्त्यांना शिफारसपत्रांची खिरापत वाटणाऱ्या आमदारांनी हात आखडता घेतला. केवळ ६३ आमदारांनी कमी-अधिक निधी दिला.

असा आहे अर्धवट बांधकामाचा प्रवास

२००५ मध्ये यात्री निवासाच्या आराखड्यास मंजुरी ७.१४ कोटी खर्च एकूण बांधकामास अपेक्षित २०९१ चौरस मीटर एकूण बांधकामाचे क्षेत्र तळमजल्यावर ८ डॉरमेंटरी खोल्या, दुसऱ्या मजल्यावर १६ शयन कक्ष, दोन्ही मजल्यांवर स्वच्छतागृहे, परिसरात बागबगिचा, विद्युतीकरण असा आराखडा होता.

पाण्यामुळे बांधकाम कमकुवत झाले
^आमदार यात्री निवासचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करून घेतले असता त्यात दोष आढळून आले. तळमजल्यात नेहमी पाणी साठते. त्यामुळे कॉलम आणि भिंती कमजोर झाल्या आहेत. हस्तांतर करण्यासंदर्भात मंदिर समितीच्या येत्या बैठकीत विचार केला जाईल.
- तुषार ठोंबरे, कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती.