आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मरणानंतर हाल:जिल्ह्यात 90 गावांत स्मशानभूमी नाही, वादामुळे पोलिसांकडे वाढत्या तक्रारी ; प्रशासनाचे लक्ष नाही

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

‘इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते!’ प्रसिद्ध गझलकार सुरेश भट यांच्या गझलेतील एक कडवं. मात्र काहींच्या बाबतीत मरणानंतरही छळ संपलेला नाही. जिल्ह्यातील ९० गावांध्ये स्मशानभूमी, दहन शेड नाही. दहनावरून वाद झाल्याने ६९ गावांमध्ये स्मशानभूमीसंदर्भात पोलिसांकडे तक्रारी दाखल झालेल्या आहेत. समस्या, अडचणीसंदर्भात प्रशासकीय टोलवाटोलवीमुळे ग्रामीण भागातील स्मशानभूमीच्या निमित्ताने समस्या धगधगत आहेत. प्रत्येक गावांमधील स्मशानभूमीमध्ये दहनशेड, रस्ता, संरक्षक भिंती बांधणे, पाणी-दिवाबत्तीची सोय करण्यासाठी शासनाने अनेकदा नागरी सुविधा व जनसुविधा, वित्त आयोग, नियोजन समिती आदी विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून दिला. गावोगावी समाजनिहाय स्मशानभूमीही वाढत आहेत. गावाचा विस्तारामुळे स्मशानभूमीच्या जवळपर्यंत लोकवसाहत वाढतीय. मागील अनेक वर्षांपासून जमिनी पडीक होत्या. पण, वाढत्या कुटुंबसंख्यामुळे त्या पडीक जमिनी लागवडीखाली येऊ लागल्यामुळे अंत्यसंस्कार करायचे कुठे, असे प्रश्न अनेक गावांमध्ये उपस्थित होऊ लागलेत. त्यामुळे सामाजिक सलोखा ढासळत आहे. काही गावांमध्ये अंत्यसंस्कारासाठी जागा नसणे, रस्ता न दिल्याच्या कारणावरून वाद-विवादाचे प्रसंग, मृतदेहांवर रस्त्यावर अंत्यसंस्कार करणे असे प्रकार घडले आहेत. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस स्टेशन अंतर्गतच्या कोणत्या गावांमध्ये स्मशानभूमी संदर्भातील तक्रारींची माहिती संकलित केली आहे. त्यावर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करण्याचे पत्र जिल्हा परिषदेस नोव्हेंबर महिन्यात सादर केले आहे. पण, अद्यापही त्यासंदर्भात जिल्हा परिषदेने फारसे गांभीर्याने त्यासंदर्भात कृतिधोरण राबविले नाही. अनेक गावांमध्ये स्मशानभूमीतील दहनशेडची विदारक अवस्था झाली. त्यामध्ये अंत्यसंस्कार करण्याऐवजी त्या परिसरातील मोकळ्या जागेत अंत्यस्कार करतात. पावसाळ्यामध्ये अनेक गावातील स्मशानभूमीची खूप विदारक स्थिती होते.

सुविधांसाठी २१ कोटींची तरतूद केली ^जिल्ह्यामध्ये एकूण १०१९ ग्रामपंचायतीपैकी स्मशानभूमी शेड नसलेली ९० गावे आहेत. पाणीपुरवठा, कंपाउंड, निवारा शेड अशा सुविधा स्मशानभूमीत नाहीत अशी ६१५ खेडी आहेत. जिल्ह्यामध्ये स्मशानभूमीची दुरवस्था आहे. बाब लक्षात घेऊन जिल्हास्तरावर २०२२-२३ साठी २१ कोटींची तरतूद केली असून, आणखी दहा कोटी वाढीव निधीही देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे अशा गावातील स्मशानभूमीच्या निवाऱ्याचा प्रश्न निकाली निघणार आहे. स्मशानभूमी संदर्भातील वाद त्वरित सोडवण्याबाबत आदेश देण्यात येईल.’’ दत्तात्रय भरणे, पालकमंत्री

काही गावे, तक्रारींचे स्वरूप {शहरालगतच्या मार्डी (ता. उत्तर सोलापूर) येथील मुस्लिम समाजाच्या स्मशानभूमीतील अतिक्रमणाबाबत वक्फ बोर्डाकडे वाद सुरू आहेत. त्याच गावातील मातंग समाज स्मशानभूमीत अतिक्रमण झाल्याने भविष्यात वादाची शक्यता आहे. {कारंबा (ता. उत्तर सोलापूर) येथील पारधी समाजाला स्मशानभूमी नाही. शेतकऱ्याने विरोध केल्याने २४ ऑगस्ट २०२१ रोजी पारधी समाजाने रास्ता रोको आंदोलन केले होते. {देगाव, खुनेश्वर (ता. मोहोळ)मध्ये स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसून, त्या जवळ राहणारे लोक अडथळा निर्माण करतात. {निंबर्गी येथे मुस्लिम दफनभूमीमध्ये काही दिवसांपूर्वी वाद निर्माण झाला होता. अपर तहसीलदार, मंद्रूप पोलिसांनी मध्यस्थी करून तो तात्पुरता वाद मिटवला. {पानीव (ता. माळशिरस) येथील गट क्रमांक १० व ३० मधील जमीन स्मशानभूमीसाठी राखीव आहे. पण, दोन्ही गटांबाबत गावात वाद आहेत. त्याबाबत निर्णय होईपर्यंत अंत्यविधीसाठी गिरझणी, यशवंतनगर येथील स्मशानभूमीचा वापर करण्याचे आदेश पंचायत समितीने दिलेत. {पोखरापूर (ता. मोहोळ) येथे पारंपरिक कब्रस्तानात दफन करण्यात अडथळा आणल्याने वाद झाला.

बातम्या आणखी आहेत...