आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादिंड्यांच्या तळावरील स्वच्छता त्वरीत व्हावी शहरातील रस्त्यांची दुरावस्था, 65 एकरातील स्वच्छता आणि स्वच्छतागृहांची कामे, पिण्याचे पाणी नियोजन, शहरातील नालेसफाई, उपनगरी भागातही दिंड्या आणि पालख्यांची तात्पुरत्या स्वरूपाची शौचालये, दैनंदिन स्वच्छता, पथदिवे, पाणीपुरवठा, शहरातील धोकादायक इमारती उतरवून घेणे, वाखरी पालखी तळावर स्वच्छता, पाणीपुरवठा, दिवाबत्ती, शहरातील कचरा उचलणे यात्रा काळात मोठे आव्हानात्मक काम असते.
यंदाची आषाढी यात्रा जेमतेम एक महिन्यावर आलेली आहे. असे असताना शाहरातील गटारे तुंबलेली आहेत. चौकात, रस्त्यावर आणि गल्ली-बोळात अतिक्रमणे वाढली आहेत. प्रदक्षिणा मार्गासह जुन्या शहरातील धोकादायक इमारती आहेत.
घंटागाड्या चालत असल्या तरी कचऱ्याचे संकलन व्यवस्थित होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे रस्त्याकडेला दिसत आहेत. शौचालये सफाई, ६५ एकरातील स्वच्छता, रस्त्याची डागडुजी अशी कामे अजूनही सुरू झालेली नाहीत. आषाढी महिन्यावर आली तरी प्रशासन तयारीला लागलेले दिसत नाही. यंदा २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे.
यात्रेच्यापूर्वी किमान ८ ते १० दिवस अगोदर पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. त्यामुळे पंढरपूर नगरपालिका प्रशासनाला यात्रेची कामे पूर्ण करण्यासाठी जेमतेम १५ ते २० दिवस उरलेले आहेत. या तीन आठवड्यात शहर आणि उपनगरी भागातील यात्रेची कामे उरकून घ्यावी लागणार आहेत. त्यातच पाऊस सुरू झाला तर यात्रेची कामे सुरू करण्यास अडचणी निर्माण होतील. चंद्रभागा नदी पलीकडील ६५ एकर मैदान ते वाखरी पालखी तळ, लक्ष्मी टाकळीपासून इसबावीपर्यंतचा उपनगरी भाग आणि घनदाट लोक वस्ती असलेला जुना गाव भाग अशा वेगवेगळ्या भागात विविध स्वरूपाची कामे करावी लागतात. त्यासाठी किमान एक महिना तयारी करणे अपेक्षित आहे.
यापूर्वी यात्रेच्या पूर्वी पंढरपूर येथे विभागीय आयुक्तांसह पालकमंत्र्यांच्या उपस्थित पंढरीत महिना, दीड महिना अगोदर बैठक होऊन नियोजन केले जायचे. तरीही ऐन यात्रेच्या काळात नियोजन कोलमडून पडलेले अनुभव आहेत. यंदा तर स्थानिक प्रशासकीय अधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दोन बैठका झालेल्या आहेत आणि त्या बैठकात मागील वर्षी जी कागदोपत्री रंगरंगोटी झाली होती त्याचीच री ओढली गेल्याचे दिसून आले. पुणे, मुंबई येथे केवळ एसटी बसेस आणि मंदिर जीर्णोद्धारासंदर्भात बैठका झालेल्या आहेत.
कामाला सुरुवात केली
आषाढी यात्रेच्या आढावा बैठका झालेल्या आहेत, त्यानुसार कामाला सुरुवात केलेली आहे. वाखरी तळावरील कामांची पाहणी करण्यात आलेली आहे, 65 एकर तळावर पाणी पुरवठा आणि इतर सुविधांचा आढावा घेतलेला आहे. चंद्रभागा वाळवंट दोन दिवसांपूर्वी स्वच्छ केले आहे, अतिक्रमणे काढण्याचे काम लवकरच सुरु होईल. नदी काठाची ड्रेनेज लाईन तपासून घेण्याचे काम सुरू आहे. -अरविंद माळी, मुख्याधिकारी, नगरपालिका, पंढरपूर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.