आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराब्रिटिश राजवटीच्या अधिकाऱ्यांवर जरब बसवून त्यांना पळवून लावून स्वातंत्र्य चळवळीत स्वातंत्र्यापूर्वीच स्वातंत्र उपभोगल्याच्या सोलापूरच्या इतिहासाचे स्मरण कार्यक्रमाच्या स्वरूपातून आज होत नाही याची खंत व्यक्त करीत नव्या पिढीसमोर इतिहासाची मांडणी झाली नाही, पण आता शाळा, महाविद्यालयातून त्याची मांडणी करण्याची गरज आहे.
बलिदान चौकाचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे ९ ते १२ मे या काळात उपक्रम केले तर इतिहासाला उजाळा मिळेल. त्यासाठी महापालिका, काँग्रेस व विविध पक्ष, कामगार संघटना, विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुढाकार घेण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. दैनिक ‘दिव्य मराठी’ने स्वातंत्रलढ्यातील जाज्वल्य इतिहासाचे विस्मरण होऊ नये म्हणून केलेला हा प्रयत्न.
मार्शल लॉ चळवळ कायमस्वरूपी प्रेरणा देणारी
सोलापुरातील मार्शल लॉ अर्थात तीन दिवस स्वातंत्र्य अनुभवता आला हा जाज्वल्य प्रसंग आहे. देशभरात सोलापूर आणि लाहोर या ठिकाणी एकाच वेळेस ब्रिटिश सत्ता असताना स्वातंत्र्य उपभोगता आले. सोलापूरमध्ये कामगार, राजकीय चळवळ यातूनच उभारी घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू यांची सोलापुरात भाषणे झाली. ती आमच्यासाठी प्रेरणादायी आहेत. देशभक्त कृ. भि. अंत्रोळीकर, तुळशीदास जाधव, दोशी, शिवदारे, दुधनी, राठी परिवार यांचेही स्वातंत्र्य लढ्यात सोलापूरसाठी मोठे योगदान आहे. यातूनच देशभक्तीची बीजे रोवली गेली.
आपले सोलापूरचे चार हुतात्मे, स्वातंत्र्याची लढ्याची चळवळ हे सर्व तरुणांनी अभ्यासले पाहिजे, जोपासले पाहिजे, त्यांची चळवळ व आठवणी याचे कायमस्वरूपी स्मरण केले पाहिजे. स्वातंत्र्य लढाईसाठी अनेकांनी अनेक मार्गाने आंदोलन केले. त्याचे नेतृत्व महात्मा गांधी यांच्याकडे होते. ते सर्वांसाठी प्रेरणादायी आहेच. सामान्य माणसाला जागृत करण्यासाठी प्रयत्न झाला. त्यामध्ये नैतिकता होती, वेगळी चळवळ उभी राहिली. हा दृष्टिकोन यातूनच मिळाला आहे. ते प्रतिबिंब आहे, कायमस्वरूपी टिकला पाहिजे असे मला वाटते. नरेश बदनोरे, माजी प्राचार्य
विद्यापीठाने इतिहासाचे पुनर्लेखन करावे
संपूर्ण भारत वर्षात ‘आझादी का अमृतमहोत्सव’ आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला जात आहे. परंतु याठिकाणी खेदाने नमूद करावेसे वाटते की, या घटनेचा, महत्त्वपूर्ण घडामोडींचा विसर सोलापूरकरांना पडला होता. आणि त्या जुन्या स्मृतींना उजाळा देण्याचे काम ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून करून दिला आहे. स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली, परंतु आजपर्यंत ९ मे ते १२ मे या कालावधीत कोणत्याही उपक्रमाचे आयोजन किंवा त्या दिवसाचे स्मरण सोलापूरकर यांच्या वतीने झालेले नाही. सोलापूरच्या अनेक स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये योगदान दिले आहे. त्यांच्याबद्दलची देखील पुरेपूर माहिती नाही. आकाशवाणीच्या माध्यमातून प्रा. डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी प्रयत्न केला आहे. सोलापुरातील अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक, उद्योगपती आणि महानगरपालिकेने रस घेऊन इतिहासाची ओळख नव्या पिढीला करून देण्यासाठी पुढाकार घ्यावा. शाळा-महाविद्यालयांनी साेलापूरच्या स्वातंत्र्याचा इतिहास या संदर्भात अभ्यासादाखल लघु प्रकल्पाच्या माध्यमातून यावर प्रकाशझोत टाकण्याची गरज वाटते.
यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाने पुढे यावं आणि सोलापूरच्या इतिहासाचं पुनर्लेखन नव्या पिढीसाठी करावं असं मला वाटतं आणि दरवर्षी सोलापुरातील या सर्व स्वातंत्र्य सैनिक आणि चार हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या विचारांचा जागर मांडण्याची वेळ आलेली आहे. आपण हे करू शकलो नाही तर येणाऱ्या काही काळातच या धुरिणींनी केलेल्या कार्याचे विस्मरण होईल आणि नव्या पिढीला सोलापूरचा इतिहास कळणार नाही. म्हणून आता आपण सारे एकत्र येऊन हा इतिहास नव्या पिढीसमोर ठेवण्यासाठी संकल्प सोडूया. प्राचार्य डॉ. उमाकांत चनशेट्टी, अध्यक्ष, महात्मा गांधी ग्लोबल व्हिलेज, बोरामणी
काँग्रेसने पुढाकार घेऊन कार्यक्रम घ्यायला हवेत
सोलापूरने देशात पहिल्यांदा स्वातंत्र्य उपभोगले. हा इतिहास आजच्या पिढीला माहिती नाही. पिढ्या बदलल्या तसा इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला गेला नाही. हा इतिहास मुलांना समजावून सांगण्याची गरज आहे. आम्ही शाळेत या संदर्भात कार्यक्रम घेत असतो. शाळांतून ही जागृती होणे आवश्यक आहे. खरे तर काँग्रेस पक्षाने पुढाकार घेऊन बलिदान चौकात त्यावेळी झालेल्या घटनांचे महत्त्व लक्षात घेऊन तेथे कार्यक्रम घेण्याची गरज आहे.
केवळ १२ जानेवारी रोजी एक दिवस कार्यक्रम घेतला जातो. आताही होतो पण स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित व्यक्तींना, ज्येष्ठांना बोलावलेही जात नाही. स्वातंत्र्य चळवळीतील हुतात्म्यांची यादी करून त्यांचे स्मरण करणारे कार्यक्रम त्या त्या भागातील शाळांनी करून देण्याची गरज आहे. बलिदान चौकातील स्वातंत्र्य चळवळीतील महत्त्व अधोरेखित झाले पाहिजे. तेथे ९ ते १२ मे या कालावधीतही कार्यक्रम झाले पाहिजेत. निर्मला ठोकळ, माजी आमदार
मार्शल लॉच्या लढ्याचा अभ्यासक्रमात समावेश करावा
मार्शल लॉ म्हणजे काय आणि त्याचा आजच्या तरुण पिढीला विसर का पडला याला कारणीभूत कोण? याच्या शोधात जाणारी कुतूहल असणारी मंडळी आज नाहीत. कारण आज देशाच्या आणि राज्याच्या समाजकारणात गढून राजकारण शिरले आहे. त्यामुळे तरुणाई विचारप्रिय ऐवजी उत्सवप्रिय झाली आहे. कोणत्या गोष्टींचा उत्सव करावा, कोणत्या गोष्टींचा करू नये याची जाणीव अजून उंचावलेली नाही. वास्तविक पाहता मार्शल लॉ हा सोलापूर साठी स्वातंत्र्याचा अभिमानोत्सव आहे. दरवर्षी ९ ते १२ मे हे चार दिवस सोलापूर चा मार्शल लॉ स्मृती दिवस साजरा करावा. या निमित्ताने मार्शल लॉ चे स्मरण करून देणारे ग्रंथप्रदर्शन उपक्रम, शालेय व महाविद्यालय स्तरावरील विविध स्पर्धा, बौद्धिक व्याख्यानमालाचे आयोजन करावे. याचा देशभर प्रचार आणि प्रसार होईल. मार्शल लॉ च्या वीर हुतात्म्यांचा त्याग व बलिदानाची गाथा तरुण पिढी समोर येईल.
अनिल वासम, माकप कार्यकर्ते
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.