आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • There Will Be Health Check ups For Volunteers From All The Villages On The Palanquin Route; Planning To Provide 20% More Facilities As Compared To The Past |marathi News

आषाढी वारी:पालखी मार्गावरच्या सर्व गावांमधील स्वयंसेविकांची आरोग्य तपासणी होणार; मागच्या तुलनेत 20 टक्के वाढीव सोयी -सुविधा देण्याचे नियोजन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ७० गावांमधून विविध संतांचा पालखी सोहळा मार्गस्थ होतो. त्या गावातील स्वयंसेविकांची माहिती एकत्रित करण्यात येतीय. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. त्यांना एका विशेष रंगाचे टी-शर्ट देण्यात येणार असून ते वारकऱ्यांच्य मदतीसाठी सहभागी होतील. तसेच, दिंडी सोहळ्यातील वारकऱ्यांच्या सोयीसाठी ३५ मोटारसायकल रुग्णवाहिका तयार केल्याची माहिती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पुणे येथे रविवारी बैठक झाली. त्यामधील नवीन सूचना, आवश्यक बदल या संदर्भात खातेप्रमुखांची आढावा बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी सोमवारी घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी माहिती दिली. श्री. स्वामी म्हणाले, “दोन वर्षांनंतर आषाढी वारी सोहळा मोठ्या स्वरूपात निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह व सार्वजनिक आरोग्य सुविधांमध्ये २० टक्के अधिक वाढ करण्यात आली आहे. त्यासंदर्भात नियोजन युद्धपातळीवर सुरू आहे. पालखी मार्गावरील सर्व गावातील स्वयंसेविकांची आरोग्य तपासणी होईल. त्यांची माहिती एकत्रित संकलित होणार आहे. संसर्गजन्य आजाराच्या खबरदारीचे उपाय म्हणून स्वयंसेवक, सहभागी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणीच्या सूचना दिल्या आहेत.

पालखी मार्गावर महिलांसाठी ४० टक्के शौचालय राखीव असतील. लाइट व पाण्याची सोय प्राधान्याने असेल. वारीसोहळ्यातील महिलांना सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणे, त्याची विल्हेवाट लावण्यासाठी ४४ ठिकाणी स्वतंत्र मशीन बसविण्यात आल्यात. स्तनदा माता, महिलांसाठी मार्गावर स्वतंत्र तात्पुरता कक्ष उभारण्यात येणार असल्याचे स्वामी यांनी सांगितले.

अडीच हजार विहिरी निश्चित
जिल्हा परिषदेने पालखी मार्गावर २६०० विहीर, कूपनलिका, खासगी विहिरी पाण्यासाठी निश्चित केल्या आहेत. सर्व जलस्त्रोतांमध्ये चांगल्या दर्जाची टीसीएल व धुराळणीसाठी जंतुनाशक पावडर खरेदी करण्यात येईल. यापूर्वीचे अनुभव पाहता, त्यामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्यांना थेट निलंबित करण्यात येईल. पालखी मार्गावरील सर्व हॉटेल, त्यामधील कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी होईल. तसेच, नियमित खाद्यपदार्थांची आरोग्य विभागातर्फे तपासणी होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...