आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करायंदा जिल्ह्यात ३७ साखर कारखान्यांनी ऊस गाळपासाठी परवानगी मागितली आहे. आतापर्यंत ३७ साखर कारखान्यांनी गाळप परवाना मिळण्यासाठी अर्ज केला आहे. गाळपासाठी जिल्ह्यात २ लाख ३० हजार हेक्टर ऊस उपलब्ध असून २०० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे.
आतापर्यंत ३३ साखर कारखान्यांनी गाळप केले होते, ३७ साखर कारखान्यांनी गाळप केल्यास हा राज्यातील सर्वाधिक संख्या ठरणार आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ३६ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. २१ लाख १९ हजार मे.टन उसाचे गाळप झाले असून १५ लाख २० हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे.
मागील दोन वर्षे झालेला पाऊस व उजनी धरणामुळे जिल्ह्यातील ऊसक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. मागील वर्षी ऊस अतिरिक्त ठरल्याने एप्रिलपर्यंत कारखान्यांचा हंगाम सुरू होता, यंदाही तशीच परिस्थिती आहे पण कारखान्यांची संख्या वाढल्याने अतिरिक्त उसाचा प्रश्न राहणार नाही, असे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यात परतीच्या पावसाने गाळप हंगाम १५ दिवस लांबणीवर पडला. यामुळे प्रत्यक्षात नोव्हेंबर महिन्यात गाळप हंगामाने वेग घेतला आहे.
ऊसदराचा प्रश्न अनुत्तरितच
शेतकरी संघटनांनी पहिली उचल २७०० रुपये देण्याच्या मागणीसाठी जिल्हाभर आंदोलन केले होते. जिल्हा प्रशासकीय बैठक निष्फळ ठरली. काही सहकारी कारखाने २२०० ते २५०० पर्यंत दर देण्यास तयार आहेत पण खासगी कारखान्यांकडून दर जाहीरच केला नाही. पंढरपूर तालुक्यात सदगुरू साखर कारखान्याने २५०० प्रमाणे पहिली उचल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे. केंद्र शासनाने १०.२६ टक्के उताऱ्यासाठी ३१०० रुपये एफआरपी ठरवून दिला आहे. पण कारखाने एफआरपी १० टक्केच्या आतच दाखवित आहेत.
१५ सहकारी, २२ खासगी
१० वर्षातील गाळप पाहता सोलापूर जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक ३३ साखर कारखान्यांनी गाळप केले आहे. पण यंदा मागील तीन ते चार वर्षे बंद असलेले साखर कारखान्यांनी गाळपाची तयारी केली आहे. यामध्ये बार्शी तालुक्यातील आर्यन (येडेश्वरी), पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सहकारी, अक्कलकोट तालुक्यातील स्वामी समर्थ व मंगळवेढा तालुक्यातील फॅबटेक कारखान्यांचा समावेश आहे. या चार कारखान्यांसह ३७ कारखान्यांनी गाळपाची परवानगी मागितली आहे. यामध्ये १५ सहकारी २२ खासगी कारखान्यांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.