आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:लग्नपत्रिका देवाला अर्पण करण्यासाठी निघालेल्या नवरदेवासह तीन जण ठार, सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यात कारला समोरून ट्रकने दिली धडक

अक्कलकोट21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाणगापूर येथे देवापुढे लग्नपत्रिका अर्पण करण्यासाठी नवरदेवासह कारमधून निघालेले तीन तरुण अक्कलकोट-गाणगापूर रोडवर बुधवारी रात्री बिजगेर (ता अक्कलकोट) येथे शक्करपीर दर्ग्याजवळ झालेल्या ट्रक-कार अपघातात जागीच ठार झाले. नवरदेव दीपक सुभाष बुचडे (२९, रा. मारुंजी, ता. मुळशी, जि. पुणे), आकाश ज्ञानेश्वर साखरे (२८, रा. हिंजवडी, ता. मुळशी, जि. पुणे) आणि आशुतोष संतोष माने (२३, रा. वाघोली, ता. हवेली, जि पुणे) अशी मृतांची नावे असून या घटनेची अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. फरार ट्रकचालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

बुधवारी रात्री दीपक सुभाष बुचडे हा आपल्या लग्नाची पत्रिका गाणगापूर येथील मंदिरात देवाचरणी अर्पण करण्यासाठी आकाश साखरे, आशुतोष माने या आपल्या मित्रांसह कारने पुणे येथून तुळजापूरमार्गे अवकलकोटहून गाणगापूरला निघाला होता. बिजगेर शिवारातील दर्ग्याजवळ ते आले असता समोरून अक्कलकोटच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने कारला जोरदार धडक दिली. त्यात कारमधील तिघे जागीच ठार झाले.

१८ जूनला होते लग्न, दुसऱ्याच्या दोन महिन्यांपूर्वी लग्न
मृत दीपक सुभाष बुचडे याचे १८ जूनला लग्न होते. त्याची लग्नपत्रिका तुळजापूर, अक्कलकोट येथे देवाचरणी अर्पण करून मित्रांसह तिघे गाणगापूरकडे जात असताना हा अपघात झाला. आकाश ज्ञानेश्वर साखरे याचे दोनच महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. तिसरा मृत अविवाहित होता.

बातम्या आणखी आहेत...