आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथे एकमेकांकडे रागाने बघितल्याच्या कारणावरून दोन गटांत तुफान दगडफेक झाली. त्यात परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून ७१ जणांवर गुन्हा दाखल झाला. अटक केलेल्या १९ जणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाली. ही घटना बुधवारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घडली होती. या प्रकरणी वळसंग येथील मोहसीन तांबोळी यांच्या फिर्यादीनुसार यासीन कटारेसह ३५ जणांवर गुन्हा दाखल झाला. यासीन कटरे यांच्या फिर्यादीनुसार मोहसीन तांबोळीसह ३६ जणांवर वळसंग पोलिस ठाण्यात दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. मोहसीन वजीर तांबोळी, सैपन वजीर तांबोळी, हारुण बाबू फुलारी, मोहसिन इसाक फुलारी, यासीन अब्बास कटरे, हजरत अब्बास कटरे, जावेद अब्बास कटरे, सोहेल अल्लाउद्दीन कटरे यांच्यासह १९ जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळाल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी सांगितले. बुधवारी वळसंग गावचा आठवडा बाजार होता. सोलापूर अक्कलकोट महामार्गावरील उड्डाणपुलाच्या खालील बस स्थानकाजवळ तांबोळी व कटरे यांच्यामध्ये एकमेकांकडे रागाने बघण्यावरून वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही गटाच्या समर्थकांनी बस स्थानक परिसरात गर्दी केली. एकमेकांवर दगडफेक सुरू झाली. काहीजण हातात काठ्या घेऊन आले होते. गावात जाणाऱ्या मुख्य रस्त्यापर्यंत हा गोंधळ सुरू होता. यामुळे बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये घबराट निर्माण झाली. दरम्यान, हा प्रकार समजताच सहाय्यक पोलिस निरीक्षक अतुल भोसले हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी दोन्ही गटांतील तरुणांना चोप देण्यास सुरुवात केली. पोलिस आल्याचे पाहून पळापळ सुरू झाली. या घटनेनंतर बस स्थानक परिसरातील दुकाने काही काळ बंद होती. त्यानंतर वळसंग पोलिसांनी संशयित आरोपींची पोलिसांनी धरपकड सुरू केली. दोन्ही गटातील १९ जणांना पोलिसांनी अटक केली. बुधवारी रात्री सव्वाअकरा वाजता परस्परविरोधी फिर्यादीनंतर एकूण ७१ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.