आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळी हा बंजारा समाजाचा सर्वांत मोठा सण. मागील वर्षीच्या होळी पौर्णिमानंतर अगदी काल-परवापर्यंत जन्मलेल्या बाळांचे बारसे धुळवडीला साजरे करण्याची प्रथा आहे. शहर व परिसरातील तांड्यांवरील २७ मुलांचे बारसे मंगळवारी पारंपरिक पद्धतीने होणार आहे. बंजारा समाजात होळीच्या दुसऱ्या दिवशी पहाटे होळी पेटवली जाते. नायक (तांड्याचा प्रमुख) आपल्या तांड्यावरील असामींच्या (प्रतिष्ठित पंचमंडळी) सल्ल्यानुसार होळी साजरा करण्याबाबत निर्णय घेतात. त्यांच्या आदेशावरून तांड्यावर होळीची तयारी केली जाते.
महिनाभर आधीपासून तांड्यांवर लेंगीचे (बंजारा लोकगीते) सूर डफड्यांच्या तालावर घुमू लागतात. ज्या युवकांचा विवाह येत्या वर्षभरात होईल, अशा दोघांची गेरिया म्हणून निवड होते. पंचांच्या सल्यानुसार गेरिया होळीचे नियोजन करतात. दिवसभर काबाडकष्ट करून गावातील लोक सायंकाळी नायकाच्या घरी गोळा होतात आणि प्रतिकात्मक होळीच्या भोवती रिंगण बनवून लेंगी गातात. या लेंगी समाज, रुढी परंपरा, राष्ट्रभक्ती, विकास आदी विषयांवर असतात.
हंडा सोडवण्याची अशीही परंपरा
मध्यभागी एका तांब्याच्या हांड्यात गव्हाची खीर (छजका) भरतात. दोन्ही बाजूने दोरखंडाने तो हंडा खुंटीला बांधतात. त्या भोवती बंजारा महिला झाडाच्या ओल्या फांद्या घेऊन उभ्या राहतात अन् तो हंडा सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या गेरियाला (पुरुषांना) झोडपून काढतात. हांडा सोडवण्यासाठी सभोवताली उभारलेल्या महिलांना पारंपारिक गाण्यांद्वारे पुरुष मंडळी सतवतात अन् संतापलेल्या महिला झोडपून काढतात, अशी प्रथा आहे. पहाटे होळी पेटवल्यानंतर सायंकाळी बंजारा महिला पुन्हा त्या होळीभोवती फेर धरून ‘होळी ये मारी बंबर पोळी, भर गेरिया री झोळी रे’अशी पारंपारिक गाणी म्हणत नवीण धान्य होळीला अर्पण करतात.
२७ बाळांचे नामकरण
बाहेरगावी नोकरीला असलेल्या लोकांना एकत्र घेऊन येणारा सण म्हणजे होळी. नेहरूनगर व परिसरातील प्रतापनगर, मंद्रूप, कुलकर्णी तांडा, शंकरनगर, तेरामैल, कंदलगाव तांड्यांवर २७ पेक्षा अधिक बालकांच्या नामकरणाचा सोहळा यंदा होणार आहे. - सोमनाथ चव्हाण, मंद्रूप
महिला रात्रभर बनवतात सुआळी...
पौर्णिमेस रात्रभर बंजारा महिला पारंपारिक गाणी म्हणत पुरी अर्थात सुआळी तयार करतात. धुंडसाठी सुआळी व खीर (छजका) यांचा नैवेद्य असतो. घोंगड्याची पाल उभारण्यात येते. त्यात आई बालकास घेऊन बसते. लोक त्या पालाच्या लाकडी वाशावर छोट्या लाकडाने प्रहार करत पारंपारीक गाणी म्हणत बाळास आर्शीवाद देतात. त्याचे बारसे केले जाते. ‘चरिक चरिया चंपा डोल, चंपा सरको नायकी कर, चंपा सरको कारभारी कर...’ अशी धुंडची पारंपारिक गाणी म्हणतात. होळीचा प्रसाद म्हणून सुआळी व सजक घेऊन जातात असे संत सेवालाल महाराज मंदिर समितीचे सुशीला जाधव यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.