आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेनेतील बंडाळीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथे झालेल्या स्थानिक नेत्यांनी बैठकीत गद्दारी करणाऱ्यांना रस्त्यावरही फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. बंडखोर एकनाथ शिंदे यांना भीती घातली जात असून ते परत येतील, अशी आशा व्यक्त झाली. शहर व जिल्हा शिवसेनेच्या आजी- माजी पदाधिकाऱ्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. गद्दारी करणाऱ्यांना निवडणुकीत वेळी जागा दाखवून देऊ. कोणतेही संकट आले तरी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समवेत प्रत्येक शिवसैनिक राहील, असा सूर बोलणाऱ्यांचा होता. एकनाथ शिंदे यांनी मांडलेली हिंदुत्वाची भूमिका शिवसेनेचीच असल्याचे सांगतानाच उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याचेही हे नेते म्हणाले. बार्शीचे भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, ‘जे गेलेले आहेत ते आपलेच आहेत. शब्दाचा बाण सोडून त्यांना दुखवायचे नाही. शिवसेनेची वेगळीच दहशत आहे. दोन आमदार परत आलेले आहेत. एकनाथ शिंदे पक्ष सोडू शकत नाहीत. भीती घातली जात आहे. जाणाऱ्यांना शिवसेना धडा शिकवणार आहे.
माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे म्हणाले की, बंडखोरांनी सत्तेत असूनही लोकांची कामे केली गेली नाहीत, उलट पक्षाची प्रतिमा मलिन केली आहे, अशी टीका केली. यावेळी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, दीपक गायकवाड, प्रा. अजय दासरी, प्रकाश वानकर, महिला सीमा पाटील, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, परिवहनचे माजी सदस्य विजय पुकाळे, युवासेनेचे महेश देशमुख हेही उपस्थित होते.
पाटील, सावंत बंडात गुवाहाटीत असलेल्या शिवसेनेच्या आमदारांत सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील आणि मुळचे माढ्याचे तानाजी सावंत (परांडा) यांचा समावेश आहे. आज झालेल्या बैठकीत या दोघांना धडा शिकविण्याची भाषा झाली. तर तिकडे गुवाहाटीतून तानाजी सावंत यांनी एक व्हिडिओ जारी करीत आमदार नितीन देशमुख हे तेथून पळून आलेले नाहीत तर त्यांना एकनाथ शिंदे यांनीच नागपुरात सोडण्याची सोय केल्याचे सांगितले. तर शहाजी पाटील यांनी सांगोल्यातील कार्यकर्त्यांना काहीही न सांगता बंडखोरांच्या गटात सहभागी झाले आहेत.
काय चालू आहे याचा अजून अंदाज नाही
पुरुषोत्तम बरडे, जिल्हा प्रमुख शिवसेना : आपल्याच पक्षातील लोक मुख्यमंत्र्यांना पाय उतार करा असे म्हणत आहेत. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. राज्यात काय चालू आहे याचा अजून अंदाज आला नाही. शिवसेनेवर संकट येत आहे. आपण सर्वजण एकत्र आलोय. जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून घेणारेही तिकडे गेलेत. सांगोल्याचे आमदार यांचा स्वभाव तर असा आहे की, इम्रान खानने बोलले असते, दोन घरे देतो म्हणून ते पाकिस्तानातही गेले असते. आम्हाला राज्यात चालणाऱ्या घडामोडीचे राजकारण स्पष्ट होऊ द्या. आमच्या जिल्ह्यातील बंडखोर लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही. पक्षाच्या विरोधात गेलेल्यांना आयुष्यात कधीही आमदार होऊ देणार नाही. दिशा स्पष्ट होईल त्यावेळी भगव्याची ताकद दाखवून देऊ.
निवडणुकीत भाजपच विरोधक असेल
गणेश वानकर, जिल्हाप्रमुख, शिवसेना : ठाकरे परिवाराला सत्तेचा मोह नाही. मागील अडीच वर्षात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहे. येणारा काळ हा आपलाच असेल. बिघडलेली परिस्थितीही सुधारेल. येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी आपला विरोधक असेल. सर्व ताकदीनिशी ठाकरे कुटुंबीयांबरोबर राहू.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.