आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणुक:राजाराम सावंत, भगीरथ भालके, सचिन वाघाटे यांची चाचपणी; विठ्ठल साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी चुरस रंगणार

सरकोलीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर तालुक्यातील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी आता चांगलीच रंगात येत आहे. तीन जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. या निवडणुकीत विद्यमान चेअरमन भगीरथ भालके यांच्या सरकोली गटात यावेळेस मोठी चुरस निर्माण होणार आहे. सरकोली गटातून भगीरथ भालके यांची उमेदवारी निश्चित आहे. अभिजित पाटील यांच्या गटाकडून आंबे येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम सावंत, प्रगतशील बागायतदार सचिन वाघाटे व महिला प्रवर्गातून वर्षा प्रकाश शिंदे यांची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत.

सरकोली गट हा पहिल्यापासून स्वर्गीय आमदार भारत भालके यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या गटातून नेहमी सभासदांनी भालके यांना पाठबळ दिले आहे. विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदारसंघात गावे नसली तरीसुद्धा या गटातील सरकोली, आंबे, चळे येथील त्यांच्या समर्थकांनी पंढरपूर मंगळवेढा विधानसभेत मोठ्या प्रमाणात प्रचारात भालके यांच्या गटाला कायम साथ दिली आहे. यावेळी चित्र वेगळे आहे. आमदार भारत भालके यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भगीरथ भालके कारखान्याचे चेअरमन झाले.

कारखाना या वर्षी चालू न झाल्यामुळे आणि शेतकरी सभासदांचे, ट्रॅक्टर मालकांचे मागील थकीत बिले वाटप न केल्यामुळे त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी या गटात दिसून येत आहे. सरकोली गटातील त्यांच्या सरकोली या गावातून त्यांना पाठबळ मिळाले तरी आंबे, चळे, रांजणी, नेपतगाव या भागातील शेतकरी सभासद त्यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यांना यावेळेस फटका बसण्याची शक्यता जास्त दिसत आहे.

अभिजित पाटील यांच्या सरकोली येथील सभेतील सभासदांची उपस्थिती पाहता सरकोली गावातूनही यावेळेस भालके यांना किती पाठबळ मिळते याविषयी भालके यांच्या समर्थकांमध्ये साशंकता आहे. या निवडणुकीत विठ्ठल परिवार एकत्रितपणे निवडणूक लढणार की स्वतंत्र लढणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव जरी चालू असली तरी दोन्ही गटांत अजूनही वेट अँड वॉच चे धोरण सभासदांनी व पदाधिकाऱ्यांनी अवलंबले आहे.

बातम्या आणखी आहेत...