आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराटाळ-मृदंगाचा निनादात सावळ्या विठूरायाचा जयघोष, रिमझिम पावसाच्या सरी अंगावर झेलत जगदगुरु संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळ्याने सोमवारी पाटस-रोटी घाट सर केला. प्रथेनुसार रोटी गावच्या वेशीवर महाआरती करण्यात आली. उंडवडी गवळ्यांची येथे तुकोबांची पालखी मुक्कामी विसावली.
आषाढी एकादशीच्या महा सोहळ्यासाठी संत तुकाराम महाराज, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा लाखो वारकऱ्यांच्या समवेत पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान ठेवला आहे. सोमवारी सकाळी वरवंड येथून तुकोबांच्या सोहळ्याने प्रस्थान ठेवले. दुपारी पाटस-रोटी घाटात पावसाच्या सरी कोसळल्या. वरुणराजा, सोहळ्याच्या स्वागतासाठी आल्याची भावना वारकऱ्यांच्या मनात होती. विठूनामाचा जयघोष करीत डोक्यावर तुळशीवृंदावन, गळ्यात टाळ-वीणा, खांद्यावर भगवी पताका घेतलेल्या वारकऱ्यांची झपझप पावलं पंढरीच्या दिशेने निघाली होती. सायंकाळी उंडवडी येथे सोहळा मुक्कामी विसावला. मंगळवारी (दि. 28) तुकोबांचा सोहळा बारामती येथे मुक्कामी येईल.
महर्षी वाल्मिकींच्या वाल्हेत माउलींचा सोहळा
राम राम म्हणा वाट चाली |
यज्ञ पाऊलो पाऊली ॥
धन्य धन्य ते शरीर|
तीर्थ व्रतांचे माहेर ॥
तपोनिधी महर्षि वाल्मिकींच्या वाल्हे नगरीत कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याचे सोमवारी (दि.२७) दुपारी आगमन झाले. सायंकाळी माउलींचे विश्वरूप दर्शन देणाऱ्या समाज आरतीनंतर सोहळा वाल्हे नगरीत विसावला. पहाटे माउलींची महापूजा प्रमुख विश्वस्त योगेश देसाई यांच्या हस्ते झाली. जेजुरी मध्ये खंडोबाचे दर्शन घेवून अनेक वारकरी कडे पठारावरून दौंडज खिंडीत सोहळ्यात सहभागी झाले. सकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दौंडज खिंडीत कांदा, मुळा भाजी, अवघी विठाबाई माझी असे म्हणत भाकरी, उसळा, विविध प्रकारच्या चटण्या व मेवा घेवून वारकर्यांनी सकाळची न्याहरी उरकली. विश्रांतीनंतर हा सोहळा वाल्हेकडे मार्गस्थ झाला. वाल्हे येथे सरपंच अमोल खवले , उपसरपंच अंजली कुमठेकर , ग्रामसेवक बाळासाहेब शिंदे यांच्यासह ग्रामस्थांनी सोहळ्याचे स्वागत केले.
नीरा स्नान करून माउलींचा जिल्ह्यात
श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा उद्या ( मंगळवार ) सकाळी 6.30 वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी मार्गस्थ होणार आहे. सकाळी हा सोहळा नीरा येथे स्नानानंतर सोहळा सातारा जिल्ह्यात प्रवेश करेल.
संत सोपानकाकांचा पालखी सोहळा नीरा गावामध्ये विसावला. सोमवारी सकाळी मांडकी येथून सोहळ्याने प्रस्थान ठेवले. जेऊर मार्गे सोहळा नीरामध्ये गावातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात विसावला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.