आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातालुक्यातील बारा गावच्या ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू आहे. काँग्रेस वगळता सर्वच पक्षात दोन-दोन गट तयार झाल्यामुळे गाव पातळीवरील नेते व कार्यकर्त्यांची पंचायत झाली आहे. शिवसेनेत शिंदे सेना, ठाकरे सेना, राष्ट्रवादीत साठे व उमेश पाटील असे उघड गट तर भाजपमध्ये देशमुख-पवार हे छुपे गट. काँग्रेस नेतृत्वहीन झाल्याने माने गट पक्षहीन झाला आहे. यामुळे कोणत्या मालकचा फोटो लावून लढवायचे हा प्रश्न गाव पातळीवर निर्माण झाला आहे.
पूर्वी गाव पातळीवर असणारी एक पक्ष एक नेता ही पद्धत नामशेष झाली. प्रत्येक गावामध्ये पक्षांतर्गत गट निर्माण झाले. जिल्ह्यात प्रत्येक पक्षातील गटातटाच्या राजकारणाचा प्रभाव गाव पातळीवरही दिसून येत आहे. तालुक्यात राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व हे जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे यांच्याकडे होते. मात्र जिल्हा कार्याध्यक्ष उमेश पाटील व साठे यांच्यात पक्षांतर्गत शीतयुद्ध सुरू झाले आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील मोहोळ मतदारसंघात उमेश पाटील यांचा स्वतंत्र गट निर्माण होऊ लागला. एकेकाळी साठे यांचे निकटचे कार्यकर्ते असणारे तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष बालाजी पवार यांनी साठे यांची साथ सोडत उमेश पाटील यांच्या छत्रछायेखाली तालुक्यात असंतुष्ट राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा गट तयार करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सध्या बारापैकी सात ग्रामपंचायती या मोहोळ-उत्तर सोलापूर विधानसभा मतदारसंघातील आहेत.
माजी आमदार दिलीप माने यांनी काँग्रेसचा त्याग केल्यानंतर अद्याप तालुक्यात पक्षाला सक्षम नेतृत्व देण्यात अपयश आले आहे. यामुळे काँग्रेसचा परंपरागत मतदार अनाथ झाला आहे. आमदार माने हे सध्या अधिकृतपणे कुठल्याच पक्षात नसल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांकडे पक्ष उरला नाही. माने गट हाच पक्ष म्हणून सध्या त्यांचे कार्यकर्ते काम करत आहेत.प्रत्येक पक्षात मालकसंख्या वाढल्याने बॅनरवर कोणाचा फोटो लावावा हा प्रश्न गाव पातळीवरील नेत्यांना पडला आहे. विशेष म्हणजे मतभेद हे पक्षीय स्वरूपाचे नसून वैयक्तिक असल्याचे दिसून येत आहे.
गाव पातळीवरील शिवसैनिक हवालदिल शिवसेनेत पडलेल्या दुहीचे परिणाम तालुक्यातील पक्षावर मोठ्या प्रमाणात दिसून आले. एकेकाळी जिवलग मित्र असणारे संजय पोळ हे ठाकरे सेनेचे तर त्यांचे मित्र सुधीर गोरे हे शिंदे सेनेचे तालुका प्रमुख झाले आहेत. नेत्यांच्या वाटणीमुळे गाव पातळीवरील शिवसैनिक हवालदिल झाला आहे. या दोन्ही गटाच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्येही अंतर्गत कलह आहेत, याचाही परिणाम गाव पातळीवरील राजकारणात होत आहे.
एकसंध भाजपातही २ गट आतापर्यंत तालुक्यात एकसंघ असलेल्या भाजपमध्ये गेल्या वर्षभरापासून दोन गट पडल्याची चर्चा राजकीय वातावरणात नेहमी होत आहे. माजी मंत्री व दक्षिण उत्तरचे आमदार सुभाष देशमुख यांचे घनिष्ठ सहकारी व भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांच्यात दुरावा आल्याची चर्चा आहे. त्यांच्या वैयक्तिक मतभेदाचा परिणाम तालुक्यातील भाजप पक्षावर मोठ्या प्रमाणात झाला आहे. पातळीवरील भाजपच्या कार्यकर्त्यांना कोणाचे नेतृत्व स्वीकारावे हा प्रश्न पडला आहे. सीना पट्ट्यात आमदार सुभाष देशमुख तर मोहोळ उत्तर विधानसभा भागात शहाजी पवार यांचा प्रभाव दिसत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.