आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आई-मुलीची पोलिसांनी घडवली भेट:मुंबईतून अपहरण केलेल्या चिमुकलीला नेताना दोन महिलांना सोलापुरात अटक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या जुहू येथून चार दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्या फातिमाला हैदराबादच्या हुसेनसागर एक्स्प्रेसमधून दोन महिला गुपचूप मुंबईला नेत होत्या. सोलापूर रेल्वेस्थानकात आल्यावर रेल्वे सुरक्षा बलाच्या कर्मचाऱ्यांनी व मुंबई क्राइम ब्रँच पोलिसांनी त्यांना बुधवारी सकाळी ताब्यात घेऊन दुरावलेल्या आईची आणि लेकीची भेट घडवून आणली आहे.

३० ऑक्टोबर रोजी जुहूच्या रस्त्यावरून एका मुलीचे अपहरण करण्यात आले. या मुलीचे वय एक वर्ष दीड महिना असे आहे. तिचे नाव फातिमा असून तिच्या आईचे नाव मुस्कान शेख असे आहे. ही घटना घडल्यानंतर तिच्या आईने ताबडतोब जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली. त्यानंतर दोन महिला त्या बाळाला घेऊन लोकलच्या पायऱ्या उतरतानाचे फुटेज त्यांना पाहायला मिळाले. त्या दोन महिलांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिस समूहांमध्ये फोटो फिरवले आणि दक्षिण भारतातील आरपीएफला देखील याची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून मुंबईतून जुहूचे क्राइम ब्रँच पथक आणि सोलापूरचे रेल्वे सुरक्षा बलाचे पथक अशी मोठ्या प्रमाणावर ही कारवाई करण्यात आली. याकरिता मुंबईहून क्राइम ब्रँचच्या जवळपास सहा सात सहकाऱ्यांना घेऊन पोलिस निरीक्षक म्हेत्रे हजर होते.

हैदराबादला का गेल्या महिला? मानवी तस्करी किंवा त्या चिमुकलीला विकून व्यवहार करण्यासाठीच या महिला तिकडे गेल्या असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार तिथे व्यवहारात काहीतरी फिस्कटले असणार आणि त्यानंतर या महिला पुन्हा आहे त्या स्थितीत पार्ल्याला येऊन पुन्हा याचा व्यवहार करण्याच्या दृष्टिकोनातून हालचाल करीत असाव्यात, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नातेवाइकांच्या मोबाइलवरून केले ट्रॅप या महिलांच्या सीसीटीव्ही फुटेजवरून त्या कुठल्या आहेत, कोण आहेत याचा पत्ता लावला गेला. त्या मुंबई पार्ल्याच्या मिठीबाई कॉलेज श्रीलंका चाळ येथील राहणार निघाल्या. सुदेता पासवान (४२) आणि शरिफा (५०) अशी त्यांची नावे निष्पन्न झाली. या दोघींना आधी सोलापूर रेल्वे सुरक्षा बलाने आणि नंतर मुंबई क्राइम ब्रँचने ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे. या महिलांची त्यांच्या नातेवाइकांच्या मोबाइलवरून शहानिशा केली. या महिला हैदराबादला जाऊन पुन्हा मुंबईकडे परत येत आहेत आणि त्यांच्यासोबत बाळही आहे, अशी माहिती मिळाली. त्यावरूनच रेल्वे पोलिसांना माहिती देत मोबाइलच्या लिंकवरून त्यांना ट्रॅप केले.

यांचे कार्य ठरले मोलाचे : पोनि सतीश विधाते,अनुज पटेल, श्याम सिंह,नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव शम्भू कुमार, अनिल गवली तथा अनिल धोटे हे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी तर मुंबईचे ऑपरेशन “आहट ” पथकाचे सिद्धराम म्हेत्रे आणि त्यांच्या पथकाने अधिक वेगाने काम केले.

बातम्या आणखी आहेत...