आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिणगी पडली, उजनीचा पाणी प्रश्न पेटणार:सोलापूरच्या परिस्थितीला आमदारच जबाबदार, पालकमंत्र्यांनाही घेरले; सत्ताधारी, विरोधक आमनेसामने

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे सोमवारी उजनी धरण पाणी संघर्ष समितीने टायर पेटवले. - Divya Marathi
पंढरपूर - सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे सोमवारी उजनी धरण पाणी संघर्ष समितीने टायर पेटवले.
  • इंदापूरला पाणी राज्य सरकारने निर्णय मागे घेतल्याचा आदेश न काढल्याने संतप्त प्रतिक्रिया
  • शरद पवार यांच्या घरासमोर उद्या खर्डा-भाकर आंदोलन

लसीकरण, उजनी धरणातील पाणी इंदापूरला नेण्याबाबतचा निर्णय, उद्योगाबाबत सुरू असलेल्या सोलापूर जिल्ह्यावरील अन्यायाबाबत सर्वच राजकीय पक्ष एकमेकांना दोष देत आहेत. सत्ताधारी पक्षांनी लस उपलब्ध करून देऊ, असा दिलासा देत जिल्ह्याला लस न मिळण्यास आमदारच जबाबदार आहेत. भाजप आमदारांनी घरात बसून पत्रव्यवहार केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तर सोलापूर जिल्हा नेतृत्वशून्य बनल्याची टीका करत पालकमंत्र्यांनी सोलापूरसाठी पाठपुरावा केला नाही, असा आरोप भाजपने केला आहे. कोणत्याही बाबतीत सोलापूरबाबत दुजाभाव होत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा शिवसेनेने दिला आहे. एकूणच सध्या या विषयावरून जिल्ह्यात प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. दैनिक दिव्य मराठीने या प्रश्नावर सर्व पक्षांच्या शहर व जिल्हाध्यक्षांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. त्यात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर विरोधकांसह महाविकास आघाडीतील काँग्रेसनेही शरसंधान केले अाहे.

पालकमंत्री, प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव
पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचे सोलापूरकडे पूर्णत: दुर्लक्ष आहे. लस कमी मिळते, ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थित नव्हता, रेमडेसिविर इंजेक्शनबाबतची तीच आेरड होती. पालकमंत्र्यांची प्रशासनावर पकड नसून, अधिकाऱ्यांमध्ये समन्वय नाही. सोलापूरचे प्रश्न सोडवावेत, अशी इच्छा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतेमंडळींची नाही. पालकमंत्र्यांनी सर्व लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून कामकाज केले असते तर कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात वाढलाच नसता. सोलापूरला मिळालेली लस पुण्याला जातेच कशी? याबाबत पालकमंत्री, अधिकारी गप्पच आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य सोलापूरकरांना बसतोय. सुरेश हसापुरे, कार्याध्यक्ष, जिल्हा काँग्रेस

पाठपुरावा सुरू आहे
सोलापूर शहर व जिल्ह्यासाठी लस कमी पडू देणार नाही. सध्या लसीकरणाबाबत काही मर्यादा आहेत. कोणावरही टीका टिप्पणी न करता, सर्व राजकीय मतभेद विसरून सोलापूरला जास्तीत जास्त लस कशी मिळेल? याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमच्यातर्फे लसीचे डोस जास्त कसे मिळतील, याबाबत संवाद मोहीम, पत्रव्यवहार सुरू आहेत. सोलापूरला लस कमी पडू देणार नाही. उजनी पाण्याबाबतही नियोजन करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत. पाणी व लस या दोन्हीबाबत शिवसेना अग्रेसर राहील गुरुशांत धुत्तरगावकर, शहर प्रमुख, शिवसेना

नेतृत्वशून्य जिल्हा
सोलापुरात भाजपचे आमदार जास्त असल्याने तीन पक्षाचे सरकार सोलापूरकडे दुर्लक्ष करत आहे. पाणी पळवण्याचा प्रयत्न होतोय. आता तर लसीची पळवापळवी होत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी हे सरकार खेळतोय. सोलापूरचा महाविकास आघाडीचे नेतृत्व नाही. कर्तव्यशून्य सरकार असल्याने अशी स्थिती झाली आहे. लसीकरणाबाबत आम्ही जाब विचारला. पण झोपी गेलेले सरकार आहे. शहाजी पवार, जिल्हाध्यक्ष, भाजप

पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला नाही
मुख्यमंत्र्यांकडे सोलापूरसाठी लस मागणी करून त्याचा पाठपुरावा करून लस आणणे आवश्यक आहे. सोलापुरातील १५ हजार लस पुण्याला नेली त्यावेळी आम्ही प्रशासनाला विचारणा केली. लसीच्या मागणीसाठी आंदोलन केले. लसपुरवठा कमी झाला, खरं आहे. यात प्रशासनाची चूक आहे. तसेच पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केला नाही. त्यामुळे साेलापूरकरांच्या जिवाशी खेळण्याचा प्रकार आहे. विक्रम देशमुख, भाजप शहराध्यक्ष

...तर रस्त्यावर उतरू
अन्यायास खासदार, आमदार पालकमंत्री जबाबदार असतात. सोलापूर वर अन्याय होतच आला आहे म्हणून विकासात सोलापूर आजही मागे आहे. लसीबाबत तरी अन्याय करू नका, जीवाशी कोणी खेळत असेल तर आम्ही रस्त्यावर उतरू. रियाज खरादी, गटनेता, एम आय एम

सर्वांनी एकत्र येण्याची गरज
केंद्र सरकारने राज्याला कमी लस दिली, त्यामुळे जिल्ह्यात लस कमी मिळाली. लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार यांनी लस मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवा होता. इतर जिल्ह्यांच्या मानाने लोकसंख्येच्या प्रमाणात लस मिळाली नाही. यावर विरोधी व सत्ताधारी लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन अधिक लस मिळविण्याचा प्रयत्न करावा. पालकमंत्री यांनीही सोलापूरला अधिक लस मिळवून देण्याचा प्रयत्न करावा.'' भारत जाधव, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस
मदतीसाठी बाहेर पडण्याऐवजी लोकप्रतिनिधींनी घरात बसून पत्रव्यवहारच केला, त्याचा हा परिणाम राज्यात इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सोलापूरला लस मिळण्यास येथील लोकप्रतिनिधींची सतर्कता, पाठपुरावा कमी पडला.

मदतीसाठी बाहेर पडण्याऐवजी लोकप्रतिनीधींनी घरातच बसून पत्रव्यवहार केला

कोरोनाच्या काळात लोकांच्या मदतीसाठी बाहेर पडून काम करण्याऐवजी घरात बसून पत्रव्यवहार करण्यावर आमदार, खासदारांचा भर दिसला. लस मिळवण्यात फक्त आमदार प्रणिती शिंदे यांचे योगदान आहे. मित्रपक्षांसह, इतर आमदार आहेत कुठे? हे आता जनतेला समजले आहे. सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव इतर जिल्ह्यांच्या तुलनेत जास्त असतानाही लस कमी मिळणे, हे अपयश आहे. या पुढील काळात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सोलापूरसाठी सर्वांनी एकजुटीने पाठपुरावा करणे गरजेचे आहे.'' प्रकाश वाले, शहराध्यक्ष, काँग्रेस

दुजाभाव होत असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही
लसीसह पाणीप्रश्न तातडीने कसा सोडवता येईल, जास्त लस कशी मिळेल, याबाबत नियोजन हवे. येत्या काही दिवसांत लसीचा साठा वाढला पाहिजे. उजनी धरण सोलापूर जिल्ह्यात आहे. त्यावर अकरा तालुके, महानगरपालिका, नगरपरिषदा, अनेक गावे, शेतकरी अवलंबून आहेत. सोलापूरच्या वाट्याचे पाणी मिळाले पाहिजे. सर्व नियोजन झाल्यानंतर शिल्लक पाणी अन्य शहरात न्या. अगोदर सोलापूरला प्राधान्य द्या. यात दुजाभाव होत असेल तर शिवसेना स्वस्थ बसणार नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाणी व लसीबाबात माहिती दिली आहे. सोलापूरचे पाणी इंदापूरला नेले, इंदापूर, सोलापूर असे प्रश्न उभा करू नयेत. कोरोनाचा काळ कठीणआहे. सोलापूरचे पालकमंत्री असल्यास आणखी चित्र वेगळे राहिले असते. पाणी मिळाल्याशिवाय अन्य शहरात जाऊ देणार नाही.'' पुरुषोत्तम बरडे, शिवसेना जिल्हाप्रमुख

मंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला
टेंभुर्णी | उजनीतून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगतिले. मात्र त्याच्या पाच दिवसांनंतरही आदेश न काढल्याने भीमानगर येथे उजनी धरणाच्या गेटवर १४ दिवसांपासून धरणे धरलेले आंदोलनकर्ते सोमवारी आक्रमक झाले. त्यांनी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला. तसेच बोंबाबोंब आंदोलन केले. उद्यापासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिली.

जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला.
जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पुतळा जाळला.

या वेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सचिन जगताप, प्रहारचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता व्यवहारे, रयत क्रांती संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. सुहास पाटील, विठ्ठल मस्के, अमोल जगदाळे, सचिन पराडे पाटील, रामदास खराडे, मल्हारी गवळी, प्रशांत महाडिक, धवल पाटील, मंगेश वाघ, दादासाहेब गायकवाड, अतुल भालेराव, अंकुश महाडिक, नारायण गायकवाड, तानाजी गायकवाड, सचिन गायकवाड, गणेश उजगिरे, सिध्दार्थ भास्कर, दत्ता आरकिले, विजयराजे खराडे, संजय नवले, श्रीराम महाडिक उपस्थित होते.

शरद पवार यांच्या घरासमोर उद्या खर्डा-भाकर आंदोलन
मोहोळ | उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय करण्याच्या मागणीसाठी बुधवारी (दि. २६) सकाळी ११ वाजता बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांच्या गोविंदबाग या निवासस्थानासमोर शेतकऱ्यांसह खर्डा-भाकर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती कै. यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश वनकळसे यांनी दिली. २२ एप्रिल रोजी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द केल्याची घोषणा केली. मात्र, जलसंपदा विभागाने अद्याप आदेश काढला नाही. उलट उजनी जलाशयात नेमके पाणी किती? हे तपासण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नमेल्याने संभ्रम निर्माण झाल्याचे ते म्हणाले.

उपरीत महामार्गावर टायर पेटवले, निषेधाच्या घोषणा
पंढरपूर | उजनीच्या पाणीप्रश्नी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द करण्याच्या मागणीसाठी उजनी धरण पाणी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी (दि. २४) पंढरपूर-सातारा राष्ट्रीय महामार्गावर उपरी येथे टायर पेटवून दिले. तसेच जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याविरोधात घोषणा दिल्या. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतल्याचे पोलिस निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सांगितले.
उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उजनी धरणातून इंदापूरला पाणी देण्यास विरोध केला आहे.

शेतकऱ्यांच्या वाढत्या विरोधामुळे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी मागील आठवड्यात उजनीतून इंदापूरसाठी मंजूर केलेल्या पाच टीएमसी पाण्याचा निर्णय रद्द केल्याचे सोशल मीडियातून जाहीर केले आहे. त्यांच्या या घोषणेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातून उजनी धरणात येणाऱ्या सांडपाण्याचे मोजमाप करण्यासाठी जलसंपदा विभागातील सेवानिवृत्त तीन अधिकाऱ्यांची समिती गठित केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. राज्य सरकारने सांडपाण्याच्या नावाखाली इंदापूरला मंजूर केलेले पाच टीएमसी पाणी देण्याचा निर्णय त्वरित रद्द करून तसा आदेश काढावा, या मागणीसाठी सोमवारपासून पाणी संघर्ष समितीने आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील उपरी येथे या आंदोलनाची पहिली ठिगणी पडली. हे आंदोलन पुढच्या काळात अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...