आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजकीय:सरकार पाडण्यासाठी ईडी, सीबीआयचा वापर; जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा गंभीर आरोप

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी ईडी असो किंवा सीबीआय आदी संस्थांचा वापर केला जात आहे. भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या सल्ल्यानंतर चौकशीचा ससेमिरा लावला जात असल्याचे अनेक वेळा समोर आले आहे, असा गंभीर आरोप राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी शनिवारी येथे केला. एमआयएमच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश झाला. याप्रसंगी ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले की, सरकार पाडण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. ही दुर्दैवी बाब असून याची आम्हाला खंत आहे. नाना पटोले यांना मी खूप वर्षांपासून ओळखतो त्यासाठी त्यांच्यावर संशय घेण्याचे कारण नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच आमची भूमिका आहे. उजनीचे पाणी पळवण्याचा प्रयत्न झाला होता यावर उजनीच्या त्या प्रश्नावर आता पडदा पडला आहे, असे सांगून जयंत पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले.

... त्या तर वावड्या
शरद पवार हे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार असल्याच्या वावड्या उठवल्या जात आहेत. खरे पाहता देशातील वेगवेगळ्या भागातील सहकार क्षेत्रातील अनेक तज्ज्ञ लोकांनी गेल्या महिनाभरात अनेक पत्रे पाठवून समस्या मांडल्या आहेत. त्या समस्या घेऊन शरद पवार हे पंतप्रधानांना भेटले असून या समस्यांचा विचार करून केंद्राने यामध्ये विशेष लक्ष देऊन रिझर्व्ह बॅँकेला योग्य त्या सूचना दिल्या पाहिजेत, अशी मागणी पवार साहेबांनी पंतप्रधानांसमाेर मांडल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

बातम्या आणखी आहेत...