आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराविरोधकांना मॅनेज करून गावागावांत दोन-तीन गटांत भांडणं लावायची आणि राजकारण करत मते मिळवायची ही पद्धत वापरून तालुक्याचे नेते म्हणवून घेणारे मिळालेल्या सत्तेचा वापर कुटुंबाच्या मौजमजेसाठी करीत आहेत. कुठं घाम गाळला, कुठला धंदा केला, कोणता उद्योग उभारला? शेतकऱ्यांच्या कारखान्याच्या जीवावर मज्जा चालू आहे. चार राष्ट्रीय महामार्ग गेलेल्या मोहोळ तालुक्याला भकास करून ठेवले असल्याचे सांगत येणाऱ्या काळात या तालुक्यातील जनतेने, तरुणांनी जागृत होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी केले.
मोहोळ तालुक्यातील कुरुल येथे जनता दरबार सभेत त्यांनी माजी आमदार राजन पाटील यांचे नाव न घेता त्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने, संयोजक अण्णासाहेब पाटील, राष्ट्रवादी युवकचे माजी जिल्हाध्यक्ष विक्रांत माने, अशोक क्षीरसागर, संजय विभूते, राहुल क्षीरसागर, श्यामराव जवंजाळ, सचिन चव्हाण, भीमाचे संचालक चंद्रसेन जाधव, प्राचार्य एन. बी. पवार, डॉ. बाळासाहेब सरवळे, गोरखनाथ पवार,आदी उपस्थित होते.
उमेश पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्यांच्या कामांना प्राधान्य देऊन दिवस-रात्र कामे केली. अधिकाऱ्यांनी कामे केली नाहीत तर जनतेला सरकार माझे आहे वाटणार नाही. जनता दरबाराच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील सर्व भागातील नागरिकांची वैयक्तिक, सार्वजनिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न आहे. आष्टी उपसा सिंचन योजनेच्या कॅनॉलला ज्यांच्या जमिनी संपादित झाल्या नाहीत त्यांना तालुक्याच्या नेत्यांमुळे मोबदला दिला गेला. खरेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित झाल्या त्या शेतकऱ्यांवर अन्याय झाला. हे कसलं राजकारण म्हणायचं? असा सवाल त्यानी केला.
लवकरच परिवर्तन : बारसकर जन्मजात नेता असल्यासारखे वागून काही होणार नाही. सर्वसामान्य जनतेमध्ये मिसळून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत, तोपर्यंत तुम्ही तालुक्याचे नेते होऊ शकत नाही. हा तालुकाही नेता म्हणून स्वीकारणार नाही, असे सांगत उमेश पाटील यांच्या माध्यमातून तालुक्याला एक धाडसी नेतृत्व मिळाले अाहे. त्या माध्यमातून येणाऱ्या काळात निश्चित परिवर्तन होणार असल्याचे रमेश बारसकर या वेळी बोलताना म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.