आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी, राज्यांतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम, मेळावे

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिकांच्या निवडणुका मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता गृहीत धरून सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले होते. त्या दृष्टीने सर्व पक्षांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मेळावे व नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीचे कार्यक्रम हाती घेतले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही सर्वच राजकीय पक्ष जोरात तयारीला लागल्याचे चित्र आहे.

प्रशासनाकडूनही करण्यात आलेली कच्ची प्रारूप प्रभाग व गट रचना रद्द होण्याची शक्यता आहे. अद्याप तसे कोणतेही आदेश नसले तरी निवडणुका लांबणीवर पडल्यास रद्दचा निर्णय होऊ शकतो.

निवडणुका स्वबळावर की आघाडी होणार, याचा निर्णय झाला नसताना सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षांचे नेते स्वत:च्या बळावरच निवडणुका लढवण्याची भाषा करीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली सर्वच तालुक्यांत पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन संघटनेच्या ताकदीची चाचपणी केली, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दौऱ्यावर येत आहेत. शिवसेनेने जिल्ह्यात व शहरात पदाधिकारी नियुक्त केले आहेत. पण त्यांच्याकडून म्हणावी तशी तयारी दिसत नाही. भाजपकडून मात्र शहरात पक्ष संघटन व निवडणुकीच्या तयारीने प्रभागनिहाय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील दोन्ही आमदारांनी पदाधिकाऱ्यांना तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

गट व गण रचना, प्रभाग रचना बदलण्याची शक्यता
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षण रद्द केल्याने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांची मुदत संपूनही घेण्यास अडचण आली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्हा परिषद, महापालिका व नगरपालिकांनी प्रारूप प्रभाग रचना, गट रचना करून आयोगास सादर केली आहे. आता शासनाने निवडणूक घेण्याचे अधिकार स्वत:कडे घेण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुका किमान सहा महिने लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. यामुळे प्रशासनाकडून तयार करण्यात आलेली प्रारूप प्रभाग व गट रचना पुन्हा नव्याने होण्याची दाट शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...