आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वेक्षण:कापडी पॅड उपक्रमाने गाव प्लास्टिक सॅनिटरी पॅड मुक्त ; मोहोळमधील घाटणेत उपक्रम

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अशय सोशल ग्रुपने सामाजिक जाणिवेतून मोहोळ तालुक्यातील घाटणे गाव दत्तक घेतले. गावातील तरुणी व स्त्रिया ज्यांना पाळी येते अशा सगळ्यांना कापडी पॅड देण्याचा अभिनव उपक्रम राबवला. ग्रामसेविका, आशा वर्कर आणि शाळेतील मदतनीस यांच्या सहकार्याने सर्वेक्षण करून हा उपक्रम घेण्यात आला. लोकवर्गणीतून हा अभिनव उपक्रम राबवण्यात येतो. हे कापडी पॅड साधारणपणे दोन ते तीन वर्षांपर्यंत वापरता येतात. यापासून कोणताही त्रास होत नाही, अशी प्रतिक्रिया महिलांनी दिली.

अशय सोशल ग्रुप दरवर्षी डिसेंबर गिविंग या नावाने मागील पाच वर्षांपासून अभिनव कार्यक्रम घेत आहे. घाटणे गावात एकूण ३४३ महिला आहेत. बाजूच्या देशमुख वस्तीसह एकूण ४६९ मुली व महिलांपैकी, २८५ महिलांना, प्रत्येकी पाचचा एक संच, २६ जानेवारी २०२२ रोजी वाटप केले. तसेच घाटणे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत वितरित केले होते. पॅड तयार करण्यासाठी २५ महिलांना कापडी पॅड कसे शिवावे याचे प्रशिक्षण दिले आहे.

कापडी पॅडमुळे आता घाटणे गाव प्लास्टिक सॅनिटरी पॅड मुक्त गाव झाले आहे. सर्व महिला या कापडी पॅडचा वापर करत आहेत. धुवून परत वापरता येते. या उपक्रमासाठी कुणाल खंडाळे, सरपंच ऋतुराज देशमुख, रितेश पोपळघट, ग्रामसेविका पार्वती माळी, डॉ. प्रीती जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

प्लास्टिकचे विघटन होत नाही म्हणून कापडी पॅड पाळीच्या वेळी हल्ली सरसकट वापरला जाणारा पर्याय म्हणजे प्लास्टिकचे सॅनिटरी नॅपकिन्स. हे खरे तर आरोग्यासाठी अयोग्य ठरतात. तसेच, महिन्याला एक स्त्री किंवा मुलगी साधारणपणे कमीत कमी १२-१५ पॅड वापरते. पॅड वापरून झाला की, तो रद्दी कागदात गुंडाळून एका प्लास्टिकच्या पिशवीत टाकून रोजच्या कचऱ्यात फेकून दिला जातो. प्लास्टिकचे जमिनीत विघटन होत नाही, जमिनीचा पोत खराब होऊन पर्यावरणाला धोका निर्माण होतो. प्रत्येक महिन्यात सॅनिटरी नॅपकिनचा खर्च वेगळाच. कापडी पॅड हे सुती कपड्याने बनवलेले असते. त्यात एक प्रतिबंधक कापडाचा एक थर वापरला जातो. ज्यामुळे, इतर कपडे खराब होत नाहीत व डाग पडण्याची चिंता राहत नाही. शिवाय, कापडी पॅड धुण्याची पद्धत खूप सोपी आहे. चार-पाच कापडी पॅडचा संच साधारण, तीन-चार वर्षे चालू शकतो. कापडी पॅड सुरक्षित आरोग्य व पर्यावरणपूरक आणि आर्थिक बचत करणारे आहे, अशी माहिती अशय सोशल ग्रुपचे सीमा खंडाळे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...