आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी महामार्गाच्या कामासाठी 15 जूनची डेडलाईन:कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी सतर्क रहावे : उपमुख्यमंत्री अजित पवार

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावरील कामे ही 15 जूनपुर्वी पूर्ण करा असा आदेश देत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी सतर्क रहावे असे आवाहन केले. पालखी सोहळ्यासोबत फिरते कोरोना उपचार केंद्र व वैद्यकीय पथक ठेवले जाईल असेही ते म्हणाले.

विधान भवन पुणे येथे रविवारी झालेल्या श्री क्षेत्र देहू व श्री क्षेत्र आळंदी पालखी सोहळा-२०२२ पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, पालखी सोहळ्याचे प्रमुख आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, पालखी सोहळ्यादरम्यान अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत त्यांना सोहळा पूर्ण होईपर्यंत कार्य मुक्त करू नये. पंढरपूर येथे फिरते शौचालय आणि टँकरची व्यवस्था वाढविण्यात यावी. शहरात पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक नियोजनासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन सूचना कराव्यात. सोहळ्याच्या आवश्यक कामासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी खर्च करा, त्याबाबत प्रस्तावही. पालखी तळ असलेल्या गावांना सुविधेसाठी निधी देण्याबाबत प्रयत्न करण्यात येईल. विभागीय आयुक्त श्री. राव यांनी सादरीकरणाद्वारे करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली.

सोलापूर जिल्ह्यातील नियोजन

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सोलापूर जिल्ह्यातील नियोजनाची माहिती दिली. पालखी आणि रिंगण सोहळ्याच्या नियोजनासाठी 21 आपत्ती व्यवस्थापन केंद्र तयार करण्यात आले आहेत. एकूण 1 हजार अधिकारी आणि 25 हजार कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. यशदामार्फत अधिकाऱ्यांना, मंदिर व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पंढरपूर शहरात पुरेशा प्रमाणात शौचालयांची व्यवस्था करण्यात आली आहे, यापैकी कायमस्वरूपी 24 हजार आहेत. एकूण 49 टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी पत्रा शेड तयार करण्यात आले आहे. पुलांचे काम सोडून इतर कामे 15 जूनपर्यंत पूर्ण होतील असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.

यावेळी पालखी प्रमुखांनी प्रशासनाला सूचना केल्या. त्या सूचनेनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी दिले. बैठकीस तिन्ही जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी, पालखी सोहळ्यातील पदाधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

  • वारीमध्ये लसीकरणाची सुविधा करण्यात आली आहे.
  • अतिरिक्त मोबाईल टॉवर उभारण्यात येणार
  • पालखी मार्गावर प्रस्थानाच्या वेळी ठरावीक मार्गावरील वाहतूक बंद करणार
  • वारीबाबत माहिती देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ॲपचे उद्घाटन करण्यात आले.
  • अधिकारी आणि सोहळा प्रमुखांच्या संयुक्त पाहणीत आढळलेल्या त्रुटी दूर करण्याचे नियोजन.
बातम्या आणखी आहेत...