आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोरेगाव येथील केंद्रात पथदर्शी प्रकल्प यशस्वी:पाकणी, जय भवानी केंद्रातही जलगुणवत्ता तपासणी यंत्रणा; जर्मनीचे सहकार्य

सोलापूर8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोरेगाव जलशुद्धी केंद्रात मागच्या वर्षी जर्मनी तंत्रज्ञान असलेले पाणी गुणवत्ता तपासणी यंत्रणा बसवली होती. तो पथदर्शी प्रयोग यशस्वी झाल्याने उरलेल्या पाकणी व जयभवानी जलशुद्धी केंद्रांत ही यंत्रणा बसवण्यात येणार आहे. यात जर्मनीने सहकार्य केले आहे.बालाजी सरोवर येथे आंतरराष्ट्रीय पाणी परिषद झाली. त्यानंतर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यात वरील माहिती दिली.

परिषदेत जर्मनीचे आंतरराष्ट्रीय संबंध विभागाचे सायमन गोहरिंग, यू.टी.बी डब्ल्यू कंपनीचे सीईओ मायकल कुहन, महाराष्ट्रातील प्रतिनिधी अशिष पंडित,अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे उपस्थित होते.प्रायोगिक प्रकल्पासाठी जर्मनीच्या बादेन-व्हर्टेमबर्ग राज्याच्या अर्थ, श्रम व पर्यटन खात्याने एक कोटी रुपये अनुदान दिले आहे. शुद्ध पाणी तपासण्यासाठी महाराष्ट्र राज्य आणि बादेन-व्हर्टेमबर्ग राज्यात सामंजस्य करार झाला आहे. त्यानुसार जुमो या जर्मन कंपनीने यंत्र बसवले. फ्राॅनहोपर विद्यापीठ, उमवेल्ट टेक्निक बीडल्ब्यू संस्थने सहकार्य केले.

भीमा नदीतून सोरेगाव येथे येणाऱ्या पाण्याचा दर्जा कसा आहे, याची तपासणी करणारा पथदर्शी प्रकल्प एक वर्षापासून सुरू आहे. कच्च्या पाण्याची पीएच व्हॅल्यू, त्यातील मातीचे प्रमाण, आर्सेनिक, कॅडनियम, काॅपर यासारखे जड धातू किती प्रमाणात आहेत? याची माहिती जर्मन सरकारने पुरवलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने लगेच कळते. या अगोदर पालिकेच्या प्रयोगशाळेतून ही माहिती मिळण्यास विलंब लागत होता.

लगेच मिळालेल्या माहितीच्या आधारे पाण्यावर प्रक्रिया करताना त्यात तुरटी, क्लोरिन व अन्य रसायने किती वापरली पाहिजेत याचे नेमके गणित पालिकेच्या कर्मचाऱ्यांना बांधणे शक्य झाले. या आगोदर हे सगळे अंदाजाने व्हायचे. त्यामुळे शुद्धीकरण खर्चही जास्त व्हायचा.पाकणी व भवानी पेठ येथील केंद्रात सोरेगावप्रमाणे यंत्रणा बसवण्यासाठी लवकरच निविदा काढणार असल्याचेही आयुक्त म्हणाले.

धोकादायक धातू आढळले नाहीत
पाण्यातील अशुद्धी, रसायन, धोकादायक धातू तपासण्यासाठी एरव्ही प्रयोगशाळेत २५ प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. स्मार्ट वाॅटर क्वालिटी माॅनिटरिंग यंत्रामुळे लगेच चाचण्या होतात आणि संगणकीय प्रणालीतून माहिती उपलब्ध होते. हे यंत्र लावण्यासाठी २०२० मध्ये करार झाला होता. कच्च्या पाण्यामध्ये जडधातूचे मानांकनापेक्षा जास्त आढळले. शुद्धी केल्यानंतर ते धातू शुद्ध पाण्यामध्ये आढळून आलेले नाहीत. त्यामुळे शुद्ध झालेले पाणी हे योग्य दर्जाचे मिळू शकले. स्काडा सिस्टिम आणि भविष्यात शहराला दररोज पाणीपुरवठा तोही शुद्ध कसा करता येईल यावर हे चांगलं मार्गदर्शन मिळाले.’’
- पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त