आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक कुटुंब दिन विशेष:आम्ही एकीने राहिलो, तुमचं..? मुले : आम्ही एकत्रच राहू, नाही तर घर सोडून जाऊ!

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चार भावंडं एकत्र कुटुंबात गुण्यागोविदानं राहिली. मुले मोठी झाल्यानंतर घरही मोठे करण्याचा विचार आला. परंतु त्यांना त्यांच्या मुलांविषयी जाणून घ्यायचे होते. सर्वांना एकत्र बोलावून विचारले, “आम्ही एका आईची लेकरं, आतापर्यंत एकत्रच राहिलो. आता कुटुंब सदस्य वाढल्याने घरही मोठे बांधावे लागेल. तुम्ही माेठे झालात, तुमचेही मत आम्हाला महत्त्वाचे वाटते. भविष्यात वेगळे राहात असाल तर घराची तशी रचना करता येईल.” त्यावर तरुण मुले म्हणाली, “आम्हीही एकत्रच राहू. नाही तर घर सोडून जाऊ...” त्यांच्या या उत्तराने भावंडांना गदगदून आले. राहते घर पाडून मोठा एकच बंगला बांधण्याचा निर्णय झाला. त्यानंतर गावातल्या वस्तीवर तात्पुरत्या शेडमध्येही ही मंडळी पुन्हा एकवटलेलीच.

चांदज (ता. माढा) येथील पाटील कुटुंबीयांची ही कथा. एकत्र कुटुंब कसे असावे? याचे मूर्तिमंत उदाहरण. एकत्र असल्याने नाती अधिक घट्ट होतात, मुलांवरील संस्कारांकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले जाते. आजी-आजोबांच्या गुजगोष्टीत नातवंडे हरवून जातात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे स्वयंपाक घरात चार माता मंडळींचे हात लागल्याने दररोज नवनवे पदार्थ खायला मिळतात. एकत्र कुटुंबाचे हे सुखद चित्र पाटील कुटुंबीयांत पाहायला मिळते.

सोलापूर-पुणे या दोन जिल्ह्यांच्या हद्दीवरील भीमा नदीच्या तीरावरचे हे चांदज. ३ हजार उंबऱ्यांचे हे गाव नेहमीच सदाहरित. जणू हिरवी शालच लपेटलेली. उसाचे विस्तीर्ण क्षेत्र, बांधावर नारळाच्या झाडांची रांग. अशा या गावाला पाटील कुटुंबाने खूप काही दिलेले. स्वतःची एक एकर बागायत जमीन देऊन शाळा सुरू केली. सोसायटीच्या माध्यमातून शेतीकर्जे देण्याचे नियोजन असते. डेअरीत गावातील दुधाचे संकलन होते. त्यामुळे गाव सुजलाम् सुफलाम् झालेले. गावकऱ्यांनीही पाटील कुटुंबीयांकडेच नेतृत्व दिले.

शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचे हे कुटुंब आता राष्ट्रवादी पक्षात गेले. याच पक्षाच्या माध्यमातून अंजनादेवी शिवाजीराव पाटील या जिल्हा परिषद तर शारदादेवी तानाजी पाटील या पंचायत समिती सदस्य झाल्या. शिवाजी आणि तानाजी यांचे वडील बलभीम पाटील यांनी शेकापच्या माध्यमातून १९७८ मध्ये निवडणूक लढवली होती. विरोधी उमेदवाराची अनामत जप्त केली होती.

बातम्या आणखी आहेत...