आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा उद्या रास्ता रोको:अनेक मागणींसाठी करणार आंदोलन

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या महिनाभरापासून सोलापूर जिल्ह्यातील ऊस संघर्ष समिती शेतकऱ्यांच्या ऊसाला पहिला हप्ता 2500 रुपये व अंतिम दर 3100 रुपये मिळावा म्हणून विविध प्रकारची आंदोलने करत आहे.

सदरील या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांच्याकडे साखर कारखान्याचे प्रतिनिधी व ऊस संघर्ष समितीचे प्रतिनिधी यांच्यामध्ये बैठकही झाली. परंतु ठोस असा कुठलाही निर्णय निघाला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जिल्हाधिकारी यांनी सांगून सुद्धा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी कायद्याचे पालन करत नाहीत. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी व कारखानदार यांच्यामध्ये अर्थपूर्ण वाटाघाटी झाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी ओव्हरलोड वाहणाऱ्या ट्रॅक्टर वर कारवाई करायला सांगून सुद्धा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी ऐकायला तयार नाहीत. या गोष्टीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी रस्ता रोको आंदोलनाची हाक देण्यात आली.

ऊस वाहतूकदार शेतकरी अण्णा भोसले यांची हत्या करण्यात आली. त्यावर अद्यापपर्यंत कुठल्याही साखर कारखानदाराने ब्र शब्द काढलेला नाही. त्यांच्या खुनाची तातडीने विशेष पथक नेमून महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठीही हे आंदोलन आहे.

ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांना मजूर पुरवतो असे सांगून लाखो रुपये त्यांच्याकडून घेतले जातात व कारखाना सुरू व्हायच्या वेळेस मजूर न देता त्यांना मारहाण करणे त्यांच्यावर खोट्या नाट्या केसेस दाखल करणे असे अनेक प्रकार सुरू होते. आत्ता तर ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांचा खून करण्यापर्यंत मजल गेलेली आहे

नुसत्या माढा तालुक्यातून यावर्षी सुमारे 1000 ऊस वाहतूक शेतकऱ्यांची सुमारे 50 ते 60 कोटी रुपयांची फसवणूक झालेली आहे. प्रत्येक वर्षी हजारो ऊस वाहतूक शेतकऱ्यांची अशीच फसवणूक केली जाते. व त्यातूनच अनेक शेतकरी आत्महत्या करत आहेत त्यावरही कारखानदार भ्रशब्द काढायला तयार नाहीत. वास्तविक कारखानदार व शासनाकडून नुकसान भरपाई ऊस वाहतूक शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे. अशा सर्व मागण्यासाठी आम्ही रस्ता रोको करत आहेत. आंदोलनाच्या वेळेस काही अप्रिय घडल्यास त्यास ऊस संघर्ष समिती जबाबदार असणार नाही.

या आहेत मागण्या

  • सोलापूर जिल्ह्यातील साखर सम्राटांच्या आडमुठ्या धोरणाच्या विरोधात
  • उपप्रादेशिक परिवहन अधिकारी सोलापूर यांच्या मनमानी व भ्रष्टाचारी कारभारा विरोधात
  • ऊस वाहतूकदार शेतकरी अण्णा भोसले यांच्या खुनाच्या चौकशीसाठी स्वतंत्र स्पेशल टीम नेमून तो खटला महाराष्ट्रात वर्ग करण्यासाठी
  • ऊस वाहतूकदार शेतकऱ्यांच्या फसवणुकी बाबत कारखानदार व शासनाने नुकसान भरपाई देणेबाबत.
बातम्या आणखी आहेत...