आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याची पंचायतराज समिती बुधवारपासून सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे. त्यांनी जिल्ह्यातील कामकाजाला सुरुवात केली आहे. बुधवारी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेऊन विभागप्रमुखांना विविध सूचना केल्या. पंचायत राज समितीचे अध्यक्ष संजय रायमूलकर यांच्या अध्यक्षतेखाली पहिल्या दिवशी सकाळी शासकीय विश्रामगृहात स्थानिक आमदार यांच्यासोबत जिल्ह्यातील प्रश्न, अडीअडचणी, सूचना याबाबत समितीने चर्चा केली.
समितीने जिल्हा परिषदेमध्ये २०१५ ते १७ या वर्षांतील लेखा परीक्षण, पुनर्विलोकन अहवालबाबत प्रत्येक विभागाचा आढावा घेतला. समिती सदस्य, अध्यक्ष यांनी कामाबाबत सूचना केल्या. समिती सदस्यांमध्ये सर्वश्री आमदार विक्रम काळे, कैलास पाटील, अनिल पाटील, सदाशिव खोत, महादेव जानकर, शेखर निकम, माधवराव पवार, डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, विजय रहांगडाले, किशोर जोरगेवार, अंबादास दानवे, किशोर दराडे, रत्नाकर गुट्टे यांचा समावेश आहे. गुरुवारी (दि. १६) ‘पीआरसी समिती’ पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा यांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. गटविकास अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांसोबत बैठका होणार आहेत.
खोतांनी नाकारली भेट
सर्व आमदारांना पुष्पगुच्छासह सोलापुरी चादरी भेट दिल्या. गठ्ठ्यात चादरी आहेत म्हणून माइकवरून कळवा, अन्यथा त्याचा वेगळा अर्थ निघेल, अशी सूचना आमदार काळे यांनी करताच उपस्थितांमध्ये हास्याचे कारंजे उडाले. याप्रसंगी रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या स्वागताला मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पुष्पगुच्छ दिला. चादरीचा गठ्ठा सीईओ स्वामी घेऊन पुढे सरसावले. पण आमदार सदाभाऊंनी तो घेण्यास नकार दिला. शिक्षण विभागाने खरेदी केलेले बेंच, फायबर कपाट खरेदीच्या निविदा प्रक्रिया, वित्त आयोगातून रुग्णवाहिका खरेदीसह, जेवण व्यवस्थेबाबत नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.